शरद यादव असे वक्तव्य अन्य धर्मियांविषयी करू धजावतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : भारतात एवढ्या देवी-देवता आहेत, की त्या मोजताही येत नाहीत. काही लोकांनी देवतांनाही जाती-जातींमध्ये विभागले आहे. भारतातील ३३ कोटी देवता भंंगारासारख्या फेकून देण्यायोग्य आहेत, असे हिंदुद्वेषी वक्तव्य जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी केले. (हिंदूंच्या धर्मभावना जाणीवपूर्वक दुखावणारे शरद यादव यांच्यासारख्यांचे हिंदुद्वेषाचे जाहीर उमाळे रोखायचे असतील, तर हिंदूंचे प्रभावी आणि कृतीशील संघटन आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने २८ नोव्हेंबर या दिवशी जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र विधानभवनाचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते यादव यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे, डॉ. बाबा आढाव, पंकज भुजबळ, आमदार कपिल पाटील, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी उपस्थित होते.
शरद यादव यांनी उधळलेली मुक्ताफळे
१. इथे कोणालाही देव मानले जाते. मग फुले आणि आंबेडकर यांचाही त्यात समावेश केला, तर काय फरक पडतो ? (एकीकडे देवतांना भंगारात टाकण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे फुले आणि आंबेडकर यांना देव बनवा, असे सांगायचे ! हा फुले आणि आंबेडकर अनुयायांना अप्रत्यक्ष लावलेला टोला समजायचा का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. भारतात आर्थिक विषमतेबरोबर जात, लिंग, पंथ या प्रकारेही विषमता जपली जाते. समाजातील काही लोक स्वत:ला संस्कृतीचे रक्षक समजून विषमतेत वाढ करत आहेत. (विषमता आणि विविधता हे निसर्गाचेच वैशिष्ट्य आहे. शरद यादव यांच्यासारख्या व्यक्ती मात्र या विविधतेचा अपलाभ घेऊन समाजात यादवी निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. आंबेडकरांनी शोषितांसाठी आरक्षण लागू केले होते; मात्र आता प्रत्येक जात आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी मोर्चे काढत आहे. दलितांना मिळालेला एक तुकडाही हिरावून घेण्याचा हा प्रयत्न चालू आहे. (डॉ. आंबेडकर यांनी वस्तूतः १० वर्षांनंतर आरक्षण रहित करण्याविषयी सूचित केले होते. मग शरद यादव डॉ. आंबेडकर यांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. या वेळी रामराजे निंबाळकर म्हणाले की, महात्मा फुले यांच्या विचारांना त्याग आणि सहिष्णुतेची झालर नसेल तर नव्या पिढीपर्यंत ते विचार योग्य रीतीने पोचतील, याविषयी शंका वाटते.