धोनी यांना श्रीविष्णूच्या रूपात दाखवल्याचे प्रकरण
अनंतपूर (आंध्रप्रदेश) : भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे.
बिझनेस टुडेच्या एप्रिल २०१३ च्या अंकात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार असतांना महेंद्रसिंह धोनी यांचे एक छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. या छायाचित्रात त्यांना श्रीविष्णूच्या रूपात दाखवण्यात आले होते. या छायाचित्रातील धोनी यांना अनेक भूजा दाखवून त्यांच्या भूजांमध्ये विविध आस्थापनांची उत्पादने दाखवण्यात आली होती. एका हातात तर जोडेही दाखवले होते आणि या छायाचित्राखाली गॉड ऑफ बिग डिल्स, असे घोषवाक्य लिहिण्यात आले होते. यातून धार्मिक भावना दुखावण्यात आल्याच्या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे नेते श्याम सुंदर यांनी वर्ष २०१५ च्या फेब्रुवारीमध्ये अनंतपूरच्या न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यापूर्वीही वर्ष २०१४ च्या जूनमध्ये धोनी यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले होते. यासह याप्रकरणी धोनी यांच्या विरोधात देहली आणि पुणे येथेही याचिका दाखल करण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात