पुणे : आज प्रत्येक जण प्रगतीच्या मागे धावत आहे. त्यामुळे ताणतणाव, विविध आजार, नकारात्मक मानसिकता आदी गोष्टी या आपल्या पाठीशी लागलेल्या असतात. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर अध्यात्म हाच त्यावरचा उपाय आहे. (अध्यात्मशास्त्र नाकारणार्या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवाद्यांना चपराक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आपल्या अवतीभोवती, निसर्गाच्या सान्निध्यात, एवढेच काय तर प्रत्येकाच्या आतमध्ये ईश्वर असतो. त्याला ओळखून त्याप्रमाणे वागले, तर आनंद, प्रेम आणि इच्छाशक्ती आदी दृढ होतात, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलिया येथील युनेस्को अध्यासनाचे प्रमुख डॉ. रसेल डिसूझा यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एम्आयटी, संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाच्या अंतर्गत आयोजित २१ वी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी बंगळुरू येथील डॉ. ई. मोहनदास, डॉ. प्रमोद तिवारी आणि माईर्स एम्आयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रसेल डिसूझा पुढे म्हणाले की, आयुष्य आनंदी होण्यासाठी प्रयत्न करतांना अनेकदा नकारात्मक भावना निर्माण होतात. आपले अध्यात्माशी नाते घनिष्ट असेल, तर या नकारात्मक प्रसंगाच्या वेळीही सकारात्मक भावना प्रज्वलित होतात आणि आनंदाचा यशोमार्ग सहज मिळतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोनासमवेतच आध्यात्मिक बैठक असायला हवी.
डॉ. ई. मोहनदास म्हणाले की, आपला मेंदू अध्यात्मिक भावनेला सहकार्य करत असतो. त्याला ज्ञानयोगही म्हणतात. सामान्य माणूस आणि आध्यात्मिक माणूस यांमध्ये काही फरक असेल, तर तो म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाला कर्माची जोड असली, तर अधिक चांगले आयुष्य जगता येते.
डॉ. प्रमोद तिवारी म्हणाले की, रोग म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली शिक्षा असते. आपण जर निसर्गाशी फारकत घेतली, तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपली पूर्वीची जीवनपद्धती आठवून पाहिली, तर आपण काय करावे, हे बर्याच अंशी समजू शकेल. वास्तविक पाहता हे सर्व आपल्याला माहीत असते; पण आपली इच्छाशक्ती आणि सातत्य न्यून पडते. त्याकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात