अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारावे हा आमचा संकल्प आहे. मग कोणतेही सरकार येवो अथवा जावो. अयोध्येत राम मंदिर बनवणारच. त्यासाठी कोणताही समझोता होणार नाही, असे भाजपचे खासदार विनय कटियार यांनी ठासून सांगितले. हाथरसमध्ये पक्षातर्फे काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेत कटियार बोलत होते. उत्तर प्रदेशचे दुरवस्था झाली आहे. ती सुधारण्यासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केले.
कटियार म्हणाले की, रामराज्य येईल, असे काम करण्याची गरज आहे. जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे, असेही कटियार यांनी सांगितले. आपली भाषा उर्दू असो की हिंदू, भाषेच्या नावावर विभाजन होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
संदर्भ : लोकसत्ता