पुणे : मंदिरे ही भक्तांची श्रद्धास्थाने आणि शक्तीचा स्रोत असल्याने त्यांना जपायला हवे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकातून जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. नदीचे वाहते पाणी जसे प्रत्येक वेळी नवीनच भासते, तसेच आपली भारतीय संस्कृतीही सनातन म्हणजे नित्य नूतन आहे, असे प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि डेक्कन अभिमत विद्यापिठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या अबोड्स ऑफ द गॉड्स (देवतांची निवास्थाने) या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार आणि लेखक रवी परांजपे, ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीकांत केळकर, सौ. अरुणा केळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर पुढे म्हणाले…
१. डॉक्टर असून देवाला मानणारे श्रीकांत केळकर स्वतःला पुरोगामी नक्कीच समजत नसतील, म्हणूनच हे कार्य त्यांच्या हातून घडले, असे मला वाटते.
२. कंबोडियामध्ये चलनातील नाण्यांवर देवळांची चित्रे, त्यांच्या राष्ट्रध्वजावरही देवळाचे चित्र आहे. या देवळांमुळेच तो देश तरला आहे, हे त्याचे प्रतीक आहे.
३. एका दगडात कोरलेले कैलास मंदिर हे जगातील आश्चर्यांपैकी एक नाही, याचे मला जास्त आश्चर्य वाटते.
कालौघात टिकून रहाणारी एकमेव भारतीय संस्कृती !- डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहासकार
इतर संस्कृती काळाच्या ओघामध्ये हरवून गेल्या; पण भारतीय संस्कृती अजूनही टिकून आहे, हीच या संस्कृतीची महानता आहे. जगातील सर्वांत प्राचीन वाड्.मय म्हणजेच वेद हे आपल्या संस्कृतीनेच दिले. छत्रपती शहाजीराजेंनी कर्नाटकातील हिंदू राज्यांना एकत्र केले आणि संकटाची जाणीव करून दिली, म्हणूनच तेथील मंदिरे आज आपल्याला पहायला मिळत आहेत. संपूर्ण भारत देशात विविधता असूनही आपली संस्कृती एक आहे. आपले सोळा संस्कार एक आहेत.
भारतियांमधील सृजनबुद्धी लोप पावण्याला इंग्रजच कारणीभूत ! – श्री. रवी परांजपे, ज्येष्ठ चित्रकार आणि लेखक
इंग्रजांनी भारतियांची तर्कबुद्धी वाढेल आणि सृजनबुद्धी संपेल, अशी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. त्यामुळेच आज भारतीय नागरिकांमधील सृजनबुद्धी लोप पावत आहे. ऐतिहासिक शिल्पांवर चित्रे काढणे, नावे कोरणे असे प्रकार म्हणजे राष्ट्रीय सौंदर्य जपण्याचे महत्त्व नष्ट झाल्याचे लक्षण आहे. सावरकरांनी म्हटले होते, ज्या वेळी देशाचा इतिहास बिघडतो, त्या वेळी त्याचा भूगोलही बिघडतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात