संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम
पुणे : जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे समाजाला पुढे नेण्याचे दायित्वही त्यांच्याकडेच आहे. यासाठी युवकांनी भारतीय संस्कृतीचा अंगीकार करायला हवा. पाश्चात्त्य नव्हे, तर भारतीय संस्कृतीच मनुष्याला आनंद मिळवून देऊ शकते. युवकांमध्ये भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची क्षमता आहे, हे लक्षात घेऊन युवकांनी भारतीय संस्कृतीनुसार आचरण करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी केले. वडगाव बुद्रुक येथील ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ मध्ये २ डिसेंबर या दिवशी संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’चे प्राचार्य डॉ. गुजर, ‘सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस’चे प्राचार्य डॉ. काणे, प्राध्यापक हेमंत रणपिसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थी, तसेच शिक्षक उपस्थित होते.
श्री. नाईक पुढे म्हणाले, ‘देशाच्या आणि पर्यायाने स्वत:च्या प्रगतीसाठी घालून घेतलेली बंधने म्हणजे संविधान ! युवकांनी वैयक्तिक जीवनाचा विचार करण्यासह देश आणि समाज यांच्या प्रगतीचाही विचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेद आणि
संस्कृत भाषा यांचा अभ्यास जगभरातील अनेक देश करू लागले आहेत. यासाठी भारतीय संस्कृती टिकवणे आणि पुनरुजीवित करणे युवकांच्या हातात आहे.’
युवकांनो, भारतीय संस्कृती टिकवून तिचे संरक्षण करा ! – प्राचार्य डॉ. गुजर
२ डिसेंबर हा प्रदूषण नियंत्रण दिन आहे; मात्र समाजातील वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी विशिष्ट प्रबोधन करणे महत्त्वाचे ठरते. युवकांना योग्य वेळी योग्य विचार मिळाल्यासच ते उज्जवल भवितव्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात. परदेशींनी शिक्का मारलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे, असे नसते, हे युवकांनी लक्षात घेऊन भारतीय संस्कृती टिकवून तिचे संरक्षण केले पाहिजे. संविधान हे केवळ पाठ करण्यासाठी नसून ते आचरणात आणायला हवे. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावले जावे, हे न्यायालयाला सांगावे लागते, याविषयी भारतियांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या प्रारंभी कयपंजीने दीपप्रज्वलन करण्यात आले.
२. परीक्षेचा कालावधी असल्याने या कार्यक्रमाला येणे विद्यार्थ्यांना ऐच्छिक ठेवण्यात आले होते, तरीही व्याख्यानासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३. कार्यक्रमाच्या ठिकाणी क्रांतिकारकांची माहिती देणारे चित्रप्रदर्शनही लावण्यात आले होते. महाविद्यालयातील १४० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
प्रतिक्रिया
प्रा. हेमंत रणपिसे – विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी आणि क्रांतिकारकांच्या जीवनातून त्यांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी, यासाठी असे व्याख्यान आणि प्रदर्शन होणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात