शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन
कणकवली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरील गंभीर आरोपांविषयी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठवणार आहे, असे आश्वासन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार नाईक यांची कणकवली येथे भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. या वेळी श्री. संजय पावसकर, श्री. सचिन तेजसिंहन्, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिनेश जंगम, श्री. अवधूत सावंत, श्री. श्रीधर मुसळे आणि सनातन संस्थेचे श्री. जयवंत सामंत उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)’ (नोंदणी क्र. ई-४६१) अर्थात् (अंनिस) या ट्रस्टविषयी दिनांक २८.६.२०१६ या दिवशी सादर झालेला निरीक्षण, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सातारा यांचा चौकशी अहवाल पहाता सदर ट्रस्टवर प्रशासक नेमावा आणि ट्रस्टचे ‘विशेष लेखा परीक्षण’ (स्पेशल ऑडिट) करावे, ट्रस्टवरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे पुन्हा फेरचौकशी करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस सातारा येथील ‘सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालया’च्या अधीक्षकांनी दिनांक १६.७.२०१६ या दिवशीच्या चौकशी अहवालावर केली आहे.
२. या अहवालामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विवेकवादाचा, पुरोगामीत्वाचा आणि बुद्धीप्रामाण्यवादाचा बुरखा फाटला असून त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे.
३. या प्रकरणी अधीक्षकांनी नमूद केलेल्या निरीक्षणांनुसार घोटाळेबाज ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वर तात्काळ प्रशासक नेमावा आणि सनातन संस्थेने वारंवार सांगितल्यानुसार ‘दाभोलकरांच्या खुनाशी त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का ?’, याची कसून चौकशी करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात