कोल्हापूर : सत्ययुगापासून कलियुगापर्यंत अनेक वेळा अशी परिस्थिती होती की परिस्थिती पालटणे शक्य नाही, असे सर्वांना वाटत होते, दुर्जन प्रबळ होते; मात्र प्रत्येक वेळी सज्जन शक्तींनी त्यांच्यावर मात केली.
रामायणकाळात रावणाचा पराभव झाला, द्वापरयुगात दुर्योधनाचा पराभव झाला. अगदी अलीकडच्या काळातही चाणक्यने चंद्रगुप्ताच्या साहाय्याने नंदाचा पराभव केला, छत्रपती शिवाजी महाराज-रामदास स्वामी यांचेही उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याचप्रकारे पूर्वी भारत अखंड होता आणि सध्या तो नसला, तरी अखंड भारताची निर्मिती ही होणारच आहे, असे मार्गदर्शन पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ – पुरीपीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.
श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मार्गदर्शनाच्या वेळी सांगितलेली अन्य सूत्रे….
१. वेदामध्येही सगुण ईश्वराचे वर्णन आहे. कलियुग ४ लक्ष ३२ सहस्र वर्षांचे असून आता केवळ ५ सहस्र ११८ वर्षे झाली आहेत.
२. ज्योतिषशास्त्राविषयी भारतात सखोल अभ्यास झाला असून त्याद्वारे अनेक गोष्टी वर्तवणे शक्य आहे. दिनांक ही पाश्चात्त्यांची पद्धत असून भारतीय लोक तिथीनुसार कृती करतात आणि तेच योग्य आहे.
३. वैराग्य, समाधी, तत्त्वज्ञान, मोक्ष या मार्गाने साधकाची वाटचाल होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात