उज्जैन (मध्यप्रदेश) : इंग्रजांनी भारताची सर्वश्रेष्ठ गुरूकूल व्यवस्था नष्ट करून निर्माण केलेल्या शिक्षणव्यवस्थेने भारतियांमध्ये स्वतःच्याच संस्कृतीविषयी तिरस्काराची भावना निर्माण केली. त्यामुळे जे जे विदेशी, ते ते येथील युवकांना प्रतिष्ठेचे वाटू लागले. आज भारतीय युवक पश्चिमी जगताच्या मृगजळामागे धावत असतांना, विदेशी लोक मात्र शांतीच्या शोधात भारताकडे येत आहेत. पश्चिमी संस्कृतीचा फोलपणा समजण्यासाठी युवकांनी धर्मशिक्षण घ्यायला हवे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथील प्रा. राहुल अंजाना यांनी त्यांच्या घरी ६ डिसेंबर या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. जाखोटिया पुढे म्हणाले की, आपल्या ऋषिमुनींनी मानवजातीच्या कल्याणासाठी इतके शोध लावले; पण त्यावर पेटंट घेऊन कधी स्वतःचा अधिकार दाखवला नाही. आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी सुखी आणि स्वस्थ जीवन आपल्या आजोबांच्या पिढीचेच होते; कारण ती पिढी धर्माचरण करणारी होती. धर्माने शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांच्या स्वास्थ्याचा विचार करून मनुष्याची जीवनशैली निर्धारित केली, तर विज्ञान आज येथेपर्यंत पोहोचलेलाही नाही. त्यामुळे आज आपल्याला पुन्हा एकदा ऋषिमुनींनी आखून दिलेल्या धर्माचे शिक्षण घेऊन त्याचे आचरण केले पाहिजे. या धर्माचरणातूनच भारताला पुन्हा वैभवाचे दिवस येतील.
क्षणचित्रे
१. श्री. राहुल अंजाना यांनी उज्जैन कुंभमध्ये सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनीला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी मासिक सनातन प्रभातही चालू केले. धर्मशिक्षणाविषयी इतरांनाही माहिती व्हावी, यासाठी त्यांनी या बैठकीचे पुढाकार घेऊन आयोजन केले.
२. या ठिकाणी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
३. हिंदु धर्माचे महत्त्व स्पष्ट करणारी काही चलचित्रेही या वेळी उपस्थितांना दाखवण्यात आली.
४. या वेळी उपस्थित युवकांनी जिज्ञासूपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
५. या बैठकीला आलेले प्रा. सुजीत बडोदिया म्हणाले, आम्हाला धर्माचरणाचे बाळकडू आमच्या आजोबांकडे मिळाले; पण आज मोबाईल-टिव्हीमध्ये गुंतलेल्या तरुणांना धर्माचरणाची काहीच माहिती नाही, याची चिंता वाटत होती; पण या कार्यक्रमानंतर ही चिंता मिटली.