छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांची उपस्थिती
सातारा : वाई (जिल्हा सातारा) येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवप्रतापदिन अर्थात् अफझलखानवधाचा आनंदोत्सव श्री महागणपति घाटावर आयोजित करण्यात आला होता. या नेत्रदीपक सोहळ्यात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज अदालत वाडा येथील निवासी श्रीमंत शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, उपाध्यक्ष श्री. विनायक सणस, सचिव श्री. यशवंत लेले, श्री. सुहास पानसे, बजरंग दलाचे श्री. रविकुमार कोठाळे, पुणे येथील हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे अधिवक्ता देवदास शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष अधिवक्ता शिरीष दिवाकर, वाईच्या प्रथम नगराध्यक्ष
डॉ. (सौ.) प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्याचे माजी उपमहापौर श्री. सुरेश नाशिककर वीर जीवा महाले गौरव पुरस्काराने सन्मानित !
प्रखर हिंदुत्वनिष्ठ, शंभूभक्त तथा पुण्याचे माजी उपमहापौर श्री. सुरेश नाशिककर यांना श्रीमंत शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या शुभहस्ते वीर जीवा महाले गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि मानाचे कडे, असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रारंभी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला, तसेच वीर जीवा महाले आणि अधिवक्ता गोपीनाथपंत बोकील यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तद्नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
हिंदूंनो, आतंकवाद हा शिवछत्रपतींप्रमाणेच संपवावा लागतो ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, आज आम्ही भारतात रहातो कि पाकिस्तानमध्ये हेच कळत नाही. हिंदूबहुल भारतात आमच्या राजाच्या पराक्रमाची गाथा आम्ही गायची नाही, त्यांनी केलेल्या प्रतापाचे गुणगान करायचे नाही, ही कसली दहशत आहे ? मतांचे आणि जातीद्वेषाचे राजकारण करून आज राज्यकर्ते तरुणांची डोकी भडकवत आहेत. हिंदूंची स्थिती दयनीय झाली असून पुरोगामी, बुद्धीवादी, विचारवंत हे सहिष्णु हिंदूंचा बुद्धीभेद करत आहेत.
हिंदु विधीज्ञ परिषदेने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा भ्रष्टाचार बाहेर काढून केवळ एका वर्षात भ्रष्ट राज्यकर्त्यांनी घशात घातलेली ३५० एकर भूमी पुन्हा देवस्थानला मिळवून दिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत ३ सहस्र ६७ देवस्थाने येतात. ही सर्वच शासनाच्या कह्यात आहेत. हिंदु विधीज्ञ परिषद यातील भ्रष्टाचारही बाहेर काढणार आहे. विवेकाचा जागर करणारे सातारा येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा बुरखा फाडण्याचे काम हिंदु विधीज्ञ परिषदेने केले आहे. श्री. राहुल कोल्हापुरे यांनी माहितीच्या अधिकारात २१ तक्रारी प्रविष्ट करून डॉ. दाभोलकर यांच्या भ्रष्टाचाराचे बिंग फोडले.
मी पत्रकार बंधूंना आवाहन करतो की, त्यांनी अंनिसला, सनदशीर मार्गाने लढा देणारे श्री. राहुल कोल्हापुरे यांच्या विरोधात अंनिसने मुंबई उच्च न्यायालयात याचिका का प्रविष्ट केली ?, असे विचारावे. संविधानावर विश्वास ठेवणारे संविधान पाळत नाहीत. आतापर्यंत त्यामध्ये १०० हून अधिक वेळा पालट करण्यात आला. अशाने संविधानाचे पावित्र्य रहाणार आहे का ? श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदूंना स्वत:चे राज्य निर्माण करून दिले. त्याप्रमाणे आजही हिंदु राष्ट्र निर्मितीला प्रारंभ झाला असून युवकांनी तन-मन-धन आणि प्रसंगी प्राणार्पण करण्याची सिद्धता ठेवून आपले धर्मकर्तव्य बजावावे.
कार्यक्रमात श्रीमंत शिवाजीराजे भोसले आणि सत्कारमूर्ती श्री. सुरेश नाशिककर यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रास्ताविक श्री. मंदार खरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनंद पटवर्धन यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. यशवंत लेले यांनी केले. वाई आणि पंचक्रोशीतील ४०० हून अधिक शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमस्थळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
२. शाहीर हेमंत मावळे आणि त्यांचे सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा कथन करणारा आणि हिंदूंमध्ये वीरश्री निर्माण करणारा अफझलखान वधाचा पोवाडा सादर केला.
३. कार्यक्रमस्थळी सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, देवतांची सात्त्विक चित्रे आदींचे प्रदर्शन लावले होते.
४. कार्यक्रमासाठी १ पोलीस उपअधीक्षक, १ पोलीस निरीक्षक, ३ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ५० हून अधिक पोलीस शिपाई असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
५. प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शहरातील २ चौकांत लावण्यात आलेले फ्लेक्स फलक पोलिसांनी कार्यक्रमाच्या आदल्या रात्री काढून टाकल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू होती. (अन्य धर्मियांच्या कार्यक्रमाचे फ्लेक्स काढून टाकण्याचे धैर्य पोलिसांनी दाखवले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. कार्यक्रमासाठी वीर जीवा महाले यांचे वंशज उपस्थित होते.
७. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून कार्यक्रमासाठी येणार्या धर्माभिमानी हिंदूंची मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी केली जात होती. (पोलिसांनी हाच वेळ आतंकवाद्यांच्या शोधार्थ दिला असता, तर देश आतंकवादमुक्त व्हायला साहाय्य झाले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात