Menu Close

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रताप दिन साजरा !

मर्दानी खेळ, अफझलखान वधाचे पथनाट्य आणि व्याख्याने यांतून जागवले धर्मतेज !

कोपरखैरणे
लोअर परळ

मुंबई : ‘अफझलखान वध’ हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा प्रसंग आहे. आतंकवाद कसा संपवावा, हे या प्रसंगातून शिवरायांनी प्रत्यक्ष कृतीतून जगाला दाखवले; मात्र अल्पसंख्याकांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी राज्यातील यापूर्वीच्या पुरोगामी सरकारने या ऐतिहासिक प्रसंगाला विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून हद्दपार केले. येणार्‍या पिढीला कदाचित या प्रसंगाची माहितीही नसेल. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाची आठवण सदैव रहावी, यासाठी गेल्या ४ वर्षांपासून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेकडून मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमीला शिवप्रतापदिन साजरा केला जातो. यावर्षीही मुंबईतील लोअर परळ, दहिसर आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी शिवप्रताप दिनानिमित्त मर्दानी खेळ, व्याख्याने आणि अफझलखान वधाचे पथनाट्य सादर करण्यात आले.

दहिसर (पूर्व)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास समाजापर्यंत पोचवण्याचा श्री शिवप्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य !- सौ. संजना घाडी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, मनसे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास समाजापर्यंत पोचवण्याचे कार्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करत आहे. हा उपक्रम स्तुत्य असून यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे मत मनसेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ. संजना घाडी यांनी व्यक्त केले. येथील संभाजीनगर परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजय घाडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर फेरीला आरंभ होऊन संभाजीनगर मैदानाच्या द्वारापासून पुन्हा संभाजीनगर येथे फेरीचा समारोप करण्यात आला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबईचे श्री. बळवंतराव दळवी उपस्थित होते. २०० हून अधिक शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या वेळी ‘गडकोट मोहिमे’विषयी धारकरी श्री. उदयराव पिंपळे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी ‘बाल मित्र मंडळा’चे अध्यक्ष दिनेशराव लखमजे यांनी सहकार्य केले. धारकरी श्री. प्रणयराव खामकर, श्री. अनिकेतराव सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

पू. भिडेगुरुजी यांनी दिलेल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक शिवप्रेमीने कटिबद्ध होऊया ! – श्री. सागर चोपदार, मुंबई समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदूंची दु:स्थिती पहाता आपण सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा कार्यक्रमांमधून संघटन आणि शौर्यजागरण होत आहे. या माध्यमातून समाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी जागृती होत आहे. पू. भिडेगुरुजी यांनी दिलेल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक शिवप्रेमीने कटिबद्ध होऊया.

कार्यक्रमाला अनुमती नाकारणार्‍या पोलिसांचा हिंदुद्वेष !

दहिसर (पू) येथे होणार्‍या कार्यक्रमाला स्थानिक पोलिसांनी अनुमती नाकारली. डीसीपी किरणकुमार चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर अनुमती देण्यात आली. (शांततेच्या मार्गाने कार्य करणार्‍या हिंदूंना अनुमती नाकारणारे पोलीस उद्दाम धर्मांधांना मात्र मोकळीक देतात ! पोलिसांचा हा हिंदुद्वेषच नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

कोपरखैरणे (नवी मुंबई)

हिंदूंनी शिवनीती आणि शिवप्रताप २४ घंटे आपल्या हृदयात जागृत ठेवायला हवा ! – अधिवक्ता तुकारामराव चिंचणीकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे आवश्यक आहे. याकरिता शिवनीती आणि शिवप्रताप २४ घंटे आपल्या हृदयात जागृत ठेवायला हवा, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे व्याख्याते अधिवक्ता तुकारामराव चिंचणीकर यांनी केले. येथील शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी १०० हून अधिक शिवप्रेमी उपस्थित होते. स्वप्नील यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला असला, तरी आजही अफझलप्रवृत्ती सर्वत्र जिवंत आहेत. काश्मीर येथून साडेचार लक्ष काश्मिरी पंडितांना हाकलून लावणारे, याकूब मेनन आणि काश्मीर येथील बुरहान वाणी या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणारे लोक या अफझल प्रवृत्तीचे आहेत. त्यांना शिवाजी महाराजांच्या नीतीनेच शिक्षा होणे आवश्यक आहे.’’

अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे तोडतांना सरकारी यंत्रणांचे हात का थरथरतात ?- अस्मितराव कोंडाळकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

इतिहास वाचणारे मावळेच इतिहास घडवू शकतात. हिंदूंच्या मंदिरांवर बिनदिक्कतपणे हातोडा चालवण्यात येतो; मात्र अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे तोडतांना सरकारी यंत्रणांचे हात का थरथरतात ?

अन्य मान्यवरांचे विचार

१. रामनाथ म्हात्रे, नवी मुंबई मंदिर समिती : आज हिंदूंची मंदिरे संकटात आहेत. ती वाचवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हायला हवे. हिंदूंचे रक्त उसळते हवे. तरच स्वराज्य टिकून राहील.

२. अजयराव बर्गे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान : गडकोट मोहीम शिवरायांचे विद्यापीठ असून यातूनच शिवरायांच्या मावळ्यांचे जीवन कसे होते, हे समजते. यासाठी जानेवारी मासात आयोजित करण्यात आलेल्या ‘पन्हाळगड ते पावनखिंड मार्गे विशाळगड’ या मोहिमेत सर्व हिंदूंनी सहभागी व्हावे.

३. मंगेश म्हात्रे, हिंदू महासभा : फासावर जातांना चापेकर बंधूंनी भगवद्गीता समवेत घेतली होती. हिंदूंनी गीता जयंती साजरी करून गीतेत सांगितल्याप्रमाणे शक्ती, युक्ती आणि नीती शिकायला हवी. १० डिसेंबरला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने होणार्‍या ‘गीता जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सवार्र्ंनी यात सहभागी होऊया.

लोअर परळ

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात नाही तर कुठे दाखवायचा ?- श्री. योगेश चिले, हिंदवी सेना

आझाद मैदानावर दंगलखोरांना अनुमती मिळते; मात्र अफझलखान वधाचा इतिहास दाखवण्यासाठी पोलीस अनुमती नाकारतात. येथे उपस्थित धारकर्‍यांपैकी एकतरी जण दंगलखोर वाटतो का ? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रात नाही तर कुठे दाखवायचा, असा संतप्त प्रश्‍न हिंदवी सेनेचे श्री. योगेश चिले यांनी केला. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. त्यांनी व्हॉट्स अ‍ॅप द्वारे समाजात पसरवण्यात येणार्‍या खोट्या इतिहासाला बळी न पडण्याचे, तसेच सत्य इतिहास समजून घेण्याचे आवाहन केले. एकूण ४ ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात आले. कार्यक्रमाला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. धारकरी पुरुषोत्तमराव बाबर यांनी गडकोट मोहिमची माहिती दिली. धारकरी गिरीधरराव बाबर आणि गणेशराव सापते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

पोलिसांच्या हस्ते ध्वजाला हार घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र म्हणण्यात आला. धारकर्‍यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आणि पोवाड्यावर अफझलखान वधाचे पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेरणामंत्र म्हणण्यात आला.

ठाणे

आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचाच मार्ग अनुसरायला हवा !- श्री. अनंत करमुसे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

३५० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमीला शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला. आजही पाकिस्तान, बांगलादेश आणि आतंकवाद यांच्या रूपाने अफझलखान जिवंत आहे. आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचाच मार्ग अनुसरायला हवा, असे प्रतिपादन श्री श्री. अनंत करमुसे यांनी केले. किसननगर, ठाणे येथे शिवप्रतापदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *