जगात हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्याचा परिणाम !
नेवाडा (अमेरिका) : लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान कृष्णाला ‘केन’ नावाने प्रचलित असलेल्या बाहुल्याच्या रूपात प्रदर्शित केले आहे. याचा तेथील हिंदूंनी तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेतील हिंदूंचे धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी ‘भगवान कृष्णाच्या रूपातील बाहुलीला प्रदर्शनातून तात्काळ काढून टाकावे’, अशी मागणी केली आहे. (परदेशातील हिंदूंचे धार्मिक नेते देवतांच्या अनादराचा निषेध तरी करतात, तर भारतात मात्र स्वतःला हिंदूंचे नेते म्हणवणारे आणि त्यांच्या संघटना याविषयी निष्क्रीयच असतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
नॉर्थ अमेरिकेतील ‘मॅट्टल’ या नामांकित आस्थापनाचा ‘केन’ हा ट्रेडमार्क आहे. वर्ष १९८६ मध्ये स्थापन झालेले ‘ला लुझ द जिझस’ हे कलादालन लॉस एंजेलिसमधील सर्वांत महत्त्वाचे कलादालन म्हणून प्रसिद्ध आहे. बिली शायर आणि मॅट कानडी हे त्या कलादालनाचे मालक अन् संचालक आहेत. वर्ष १९६१ मध्ये मॅट्टल आस्थापनाने ‘बार्बी’ बाहुलीचा काल्पनिक प्रियकर म्हणून ‘केन’ हा बाहुला बाजारात आणल्याचे म्हटले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात