जळगाव : गिरणा व मन्याड नदीच्या संगमावर तसेच जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सायगाव (बगळी) येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मार्गशीर्ष पौर्णिमापासून (दत्त जयंती) यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. ३०० वर्षांची ही परंपरा असून गावापासून काही अंतरावर ही यात्रा भरते.
सुमारे ३०० वर्षापूर्वी मंदिराच्या परिसरात शेतकरी शेती नांगरणी करीत असताना शेतकऱ्यास दत्ताची मूर्ती सापडली होती. मूर्ती शेतकऱ्याने घरी आणून ठेवली त्याच रात्री त्याला स्वप्नात ‘तुला ज्या ठिकाणी मूर्ती सापडल्या त्याच ठिकाणी माझी स्थापना कर’ असा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे मंदिराची उभारणी झाली. सायगावचे श्री दत्त मंदीर अतिशय जागृत स्थान मानले जाते. श्रद्धा असणाऱ्यास चांगली फलश्रुती मिळते असे सांगितले जाते.
यात्रेचे वैशिष्ट्ये
सायगाव व गिरणा परिसरात दत्त जयंतीचे एक वैशिष्ट्ये म्हणजे नवस म्हणून चांदीचे घोडे अर्पण करणे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविणे अशा अनेक प्रथा येथे आजही पूर्ण केल्या जातात. या गिरणा परिसरात महानुभाव पंथीयांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर राहतात त्यामुळे या यात्रेला एक वेगळाच उत्साह राहतो व प्रत्येक महानुभव पंथीय काहीना काही नवस आपल्या लाडक्या प्रभूला पूर्ण करत असतो.
खान्देशातील जी काही इतिहास प्रसिद्ध दत्ताची देवस्थान आहेत. त्या देवस्थानाच्या मालिकेत चाळीसगाव तालुक्यात सायगाव येथील दत्त स्थानाची गणना होते. यात्रेनिमित्त प्रत्येक घरी पुरणपोळीचा ताट दिला जातो. वेगवेगळे नवस येथे केले जातात.
संदर्भ : लोकमत