धर्मसभांंसह अनेक उपक्रमांचे नियोजन, धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग !
सोलापूर : येथे ४ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर ठिकठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आतापर्यंत खानापूर, नान्नज, विडी घरकूल, शेळगी, बक्षिहिप्परगा, दहिटने आणि हत्तूर या सात ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. खानापूर येथे ६०, तर हत्तूर येथे २० धर्माभिमानी उपस्थित होते.
या सर्व बैठकांच्या माध्यमातून पुष्कळ धर्माभिमानी कृतीशील झाले असून अनेक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये खानापूर येथे धर्मजागृती सभा घेण्याचे निश्चित झाले. सर्व ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे ठरले.
३१ डिसेंबरमुक्त सोलापूर करण्यासाठी ठिकठिकाणी फलकप्रसिद्धी करून हस्तपत्रके, भित्तीपत्रके लावण्याचे; तसेच स्वाक्षरी मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याचे निश्चित झाले. सर्व धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी होणार, तर काही जणांनी दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होणार असल्याचे सांगितले. हत्तूर येथे ३१ डिसेंबरची पत्रके छापण्यासाठी धर्माभिमान्यांनी वर्गणी गोळा करून रक्कम गोळा केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात