Menu Close

क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

मार्गदर्शन करतांना शंकराचार्य, बाजूला स्वामी निर्विकल्पानंद महाराज आणि उज्जैनचे महंत पू. शेखरानंदजी महाराज

उज्जैन : क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. स्वातंत्र्यापासून आजपर्यंतची स्थिती पाहिल्यास, त्यांच्या स्वप्नातील भारत हाच आहे का ? क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारताचा प्रत्येकाने विचार केल्यास देशात परिवर्तनाची दिशा स्पष्ट होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले. येथील हरसिद्धी मंदिराच्या सभागृहात आयोजित विद्वत गोष्टीत जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना ते बोलत होते. या वेळी त्यांचे उत्तराधिकारी स्वामी निर्विकल्पानंद महाराज आणि उज्जैनचे महंत पू. शेखरानंदजी महाराज उपस्थित होते.

शंकराचार्य म्हणाले की, धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणारे राज्यकर्ते हे राजधर्माचीच हत्या करत आहेत. मंदिर, शिक्षण हे क्षेत्र धर्माच्या नियंत्रणातील आहेत; पण आज या क्षेत्रावर राज्यकर्त्यांनी नियंत्रण मिळवले आहे. ही अराजकतेची पराकाष्ठा आहे. समान नागरी कायद्याच्या संदर्भात ते म्हणाले, या कायद्याचा अर्थ आणि आधार काय आहे ? समान नागरी कायदा म्हणजे कोणाला कोणाच्या समान करणार ? हिंदूंच्या मागे सर्व येणार कि इतरांच्या मागे हिंदूंना नेणार ? या सर्वांतून हिंदूंचाच बळी जाणार आहे.

हिंदूंवरील समस्यांविषयी ते म्हणाले, हिंदूंना प्रतिद्वंद्वी कोणी नाही. हिंदूंचे शत्रू मात्र अनेक आहेत. दर्शन, विज्ञान आणि व्यवहार या स्तरावर शतप्रतिशत हिंदूंना आव्हान देणारे कोणीच नाहीत. अरबो वर्षांची आमची परंपरा हे चुटकीसरशी संपवू शकत नाहीत. आज विश्‍व हिंदु धर्माचा स्वीकार करायला सिद्ध आहे; पण भारताचे राज्यकर्ते आणि जनता मात्र हे स्वीकार करायला सिद्ध नाही, हे दुर्दैव आहे.

आरक्षणाविषयी शंकराचार्य म्हणाले, आम्ही हिंदु धर्माने सांगितलेल्या आरक्षणाचे कट्टर समर्थक आहोत. आमच्या धर्माने वर्णाश्रमव्यवस्थेच्या अंतर्गत प्रत्येकाची जिविका निर्धारित केली होती. आज नोकर्‍या उपलब्ध नसतांनाही शासन आरक्षणाची भाषा करून छळ करीत आहे. आज भारतातील मेधा शक्तीचा उपयोग कोणी करत नसल्याने विदेशी त्याचा उपयोग करत आहे. आज पूर्ण विश्‍व हिंदु धर्माचा स्वीकार करण्यास सिद्ध आहे; पण भारतातील राज्यकर्ते आणि जनता मात्र त्यापासून हिंदु धर्माचा अंगिकार करण्यास सिद्ध नाही. असे असले, तरी आपला धर्म सत्य आहे आणि सत्य आपला मार्ग काढेल.

क्षणचित्र : या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. योगेश व्हनमारे यांनी पुष्पमाला आणि फळे अर्पण करून शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच त्यांना पाक्षिक सनातन प्रभात भेट देऊन कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *