हैदराबादमधील दिलसुखनगर भागात २०१३ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी यासीन भटकळ आणि इतर चार जणांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकास अशी उर्वरित चार दोषींची नावे आहेत.
दिलसुखनगरमध्ये २१ फेब्रुवारी २०१३ रोजी दोन स्फोट झाले होते. यामध्ये १८ जण ठार तर १३१ जण जखमी झाले होते. याप्रकरणी भटकळ, असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकाससह रियाझ भटकळविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील रियाझ भटकळ हा सध्या पाकिस्तानमध्ये असून उर्वरित पाच जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती.
गेल्या वर्षी २४ ऑगस्टला राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या न्यायालयात भटकळ आणि त्याच्या साथीदारांविरोधात सुनावणी सुरु झाली होती. गेल्या आठवड्यात एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीन भटकळ आणि त्याच्या चार साथीदारांना दोषी ठरवले होते. इंडियन मुजाहिदीन या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्यांना दहशतवादाच्या प्रकरणात दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ होती. भादंवि कलमे, शस्त्रास्त्र कायदा व बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदान्वये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते.
सोमवारी एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीन भटकळ, असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकास या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली. यातील एझाज शेख हा महाराष्ट्राचा आहे. तर झिया उर रहमान हा पाकिस्तानचा आहे
स्त्रोत : लोकसत्ता
अद्यावत
१४ डिसेंबर २०१६
हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळसह अन्य चारजण दोषी
नवी देहली : हैदराबादमधील दिलसुखनगर येथे २०१३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ याच्यासह इतर चार जणांना हैदराबाद न्यायालयाने दोषी ठरवले आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना दहशतवादी कृत्याप्रकरणी दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ असून, दोषी दहशतवाद्यांना १९ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी हैदराबादमधील दिलसुखनगर येथे झालेल्या बॉम्बस्फोटात १८ जण ठार तर १३१ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी रियाझ भटकळ अद्याप फरार आहे.
संदर्भ : लोकमत