-
विरारमध्ये ठिकठिकाणी उघड्यावर ठेवलेल्या देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती एकत्रित करून त्यांचे समुद्रात विसर्जन केले !
-
हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गाचा परिणाम !
देवतांची चित्रे रस्त्यावर कुठेही ठेवल्याने त्यांच्या होणार्या अनादराचे आणि विटंबनेचे पाप चित्रे ठेवणार्याला लागते. अशा प्रकारे देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी जीर्ण झालेली देवतांची चित्रे किंवा मूर्ती प्रार्थना करून जलाशयात विसर्जित कराव्यात अथवा अग्नीत समर्पित करावीत, असे शास्त्र सांगते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
विरार (मुंबई) : अनेक हिंदू घरामध्ये नको असलेली देवतांची चित्रे शहरातील पारा, कठडा अशा ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी घाणीमध्ये देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आढळतात; मात्र त्याविषयी हिंदूंना काहीच वाटत नाही. रस्त्यावर, घाणीच्या ठिकाणी अशा प्रकारे अस्ताव्यस्त ठेवलेल्या देवतांच्या चित्रांमुळे देवतांचा अवमान होत असल्याचे येथील जय हिंदुत्व आणि युवा सेना यांच्या धर्माभिमानी युवकांच्या लक्षात आले. या युवकांनी शौर्यदिनाचे औचित्य साधून ६ डिसेंबर या दिवशी शहरात ठिकठिकाणी पडलेली देवतांची चित्रे एकत्रित करून समुद्रात विसर्जित केली. श्री. शिव यादव यांसह १४ धर्माभिमानी युवकांनी यामध्ये सहभाग घेतला. (धर्मशास्त्र कळल्यावर त्यानुसार आचरण करणारे असे जागरूक धर्माभिमानी सर्वत्र असल्यास हिंदु राष्ट्राची पहाट दूर नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयी मनोगत व्यक्त करतांना धर्माभिमानी युवकांनी सांगितले, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या धर्मशिक्षणवर्गात जात असल्यामुळे अशा प्रकारे देवतांचे विडंबन होत आहे, हे आमच्या लक्षात आले आणि ते रोखण्यासाठी कृती झाली. (यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे दिसून येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
येथील फुलपाडा, एम्.बी. ईस्टेट, विवा कॉलेजजवळ, गोकुळ टाऊनशिप आदी विविध ठिकाणी झाडांखाली अस्ताव्यस्त पडलेल्या देवतांच्या १०० प्रतिमा आणि २० मूर्ती धर्माभिमानी युवकांनी एकत्रित केल्या आणि सायंकाळी या सर्व मूर्ती आणि त्यांची छायाचित्रे यांचे समुद्रात भावपूर्ण विसर्जन केले. समुद्राला भरती असल्यामुळे विसर्जित मूर्ती आणि प्रतिमा पुन्हा बाहेर येण्याची शक्यता होती; मात्र भावपूर्ण प्रार्थना केल्यामुळे समुद्रदेवतेने विसर्जित सर्व प्रतिमा स्वत:च्या उदरात सामावून घेतल्याची अनुभूती आल्याचे धर्माभिमानी युवकांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात