Menu Close

आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय : ४० वर्षांपासून संस्कृतमध्ये वकिली करणारे देशातील एकमेव अधिवक्ता

अधिवक्ता उपाध्याय यांच्यासारखे धर्मनिष्ठ अधिवक्ते हे हिंदूंसाठी आदर्श होत. जे हिंदु धर्माचरण करण्यास कचरतात, लाजतात अथवा त्यास अव्यवहार्य म्हणतात, त्यांनी उपाध्याय यांच्याकडून धर्माचरणाची तीव्र तळमळ, प्रबळ इच्छाशक्ती आणि धर्माभिमान शिकायला हवा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

वाराणसी : येथील अधिवक्ता आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय यांचे देववाणी संस्कृतप्रती असलेले समर्पण कौतुकास्पद आहे. ते गेल्या ४० वर्षांपासून संस्कृतमध्येच वकिली करत आहेत. मागील ४० वर्षांत संस्कृतमध्ये वकिली करतांना त्यांच्या बाजूचे निकाल आणि आदेशही न्यायाधिशांनी संस्कृत किंवा हिंदीतच दिले आहेत.

१. आचार्य श्यामजी उपाध्याय संस्कृत अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९७८ मध्ये अधिवक्ता बनले. तेव्हापासून त्यांनी संस्कृतमध्येच कामकाज केले आहे.

२. ते सर्व न्यायालयीन कामकाज जसे शपथपत्र, विनंतीपत्र, दावा, वकिलनामा आणि प्रतिवादही संस्कृतमध्येच करत आले आहेत.

३. उपाध्याय यांच्या संस्कृतच्या वापरामुळे विरोधी पक्षकारांना त्रास होण्यासंदर्भात ते म्हणाले, ‘मी संस्कृतच्या सोप्या शब्दांचा तोडून-तोडून वापर करतो, त्यामुळे न्यायाधिशांपासून विरोधी पक्षकारांना कोणतीही अडचण येत नाही. जेव्हा संस्कृतमधील प्रतिवादाला विरोधी पक्षकाराची मान्यता नसेल, तेव्हा मी हिंदीत कार्यवाही करतो.’’

४. संस्कृत भाषेविषयी श्रद्धा ठेवणारे उपाध्याय प्रतिवर्षी न्यायालयात संस्कृत समारंभही साजरे करतात. यासमवेतच त्यांचे संस्कृतमध्ये साहित्यही प्रकाशित झाले आहे.

५. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे उपाध्याय संस्कृतमध्ये वकिली करणारे एकमेव अधिवक्ता असल्यामुळे त्यांच्या नावाची नोंद ‘गिनिज बुक’मध्ये व्हायला हवी, असे त्यांना वाटते. न्यायालयातील कामकाज संपल्यावर त्यांचा वेळ संस्कृतचे विद्यार्थी आणि संस्कृतमधील जिज्ञासू अधिवक्ता यांना विनामूल्य शिकवण्यात जातो.

६. संस्कृत भाषेत रूची असणारे ज्येष्ठ अधिवक्ता शोभनाथ लाल श्रीवास्तव म्हणाले, ‘‘संस्कृत भाषेमुळे संपूर्ण न्यायालयात लोक अधिवक्ता उपाध्याय यांच्या पाया पडत असतात. जेव्हा ते कोर्टरूममध्ये असतात, तेव्हा त्यांचा सोप्या संस्कृत भाषेतील प्रतिवाद लोक शांतपणे ऐकतात. वर्ष २००३ मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने संस्कृत भाषेत अभूतपूर्व योगदानाविषयी त्यांचा ‘संस्कृतमित्र’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *