देवास : दत्तजयंतीच्या निमित्ताने बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या वेळी देवास, इंदौर, भोपाळ, उज्जैन आणि महाराष्ट्रातील सहस्रो भक्तांनी दत्तगुरूंचे दर्शन घेतले. पहाटे ५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर गुरूचरित्राचे पारायण केले गेले. सायंकाळी ५.३५ वाजता दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्तजन्मानंतर आरती, पाळणागीत म्हणून नंतर प्रसाद वितरण करण्यात आले. सायंकाळी झालेल्या महाआरतीलाही भक्तांची मोठी गर्दी होती. रात्री कविसंमेलनही पार पडले. या कविसंमेलनात कवींनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी वीररस उत्पन्न करणार्या कविता म्हणून उपस्थितांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची भावना जागृत केली.
दत्तजयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी अध्यात्मप्रसार !
या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने देवालय दर्शन, साधना, धर्माचरण, यांविषयी मार्गदर्शन करणार्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातन संस्था प्रकाशित विविध विषयांवरील अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचे वितरण कक्षही येथे उभारण्यात आले. या प्रदर्शन कक्षाच्या उभारणीसह सेवेसाठी आलेल्या साधकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्थाही मंदिराचे श्री. दत्तप्रसाद कुलकर्णी यांनी केली.
बांगरप्रमाणेच वैशालीनगर, इंदौर येथील केशवानंद आश्रम ट्रस्टच्या दत्त मंदिरात आणि उज्जैन येथील ऋषिनगरमधील दत्तमंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद होता. या ग्रंथ प्रदर्शनासाठी इंदौर येथे श्री. कोराने महाराज आणि उज्जैन येथे विश्वस्त श्री. कोरडे आणि श्री. प्रमोद पाठक यांचे सहकार्य लाभले.