देहलीच्या जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
देहली : रेल्वे स्थानकांवर क्रूर मोगल बादशाह अकबराचे चित्र लावण्यात येऊ नये, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघामध्ये उपस्थित करावे आणि भारतीय रिझर्व बँकेने केंद्र सरकारकडे पाठवलेला ‘इस्लामिक बँकींग’चा प्रस्ताव सरकारने स्वीकारू नये, यांसाठी देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेना, अखंड भारत मोर्चा, बजरंग दल, वैदिक उपासना पीठ, वेद भारती संस्कार शाळा, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यकर्त्यांसह विविध हिंदुनिष्ठ धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.
हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले विचार . . .
१. श्री. नीरज सेठी, राज्यप्रमुख, शिवसेना, देहली : रेल्वे स्थानकांवर मोगल बादशाह अकबराचे छायाचित्र आणि कथा कधीही लावू देणार नाही, तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू !
२. श्री. संदीप आहुजा, अखंड भारत मोर्चा, देहली : ज्या महाराणा प्रतापने अकबराला आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावले, त्या अकबराला सन्मान देण्याचा देशात विषय चालू आहे. हिंदुस्थानचा इतिहास कलंकित करून त्यात धर्मनिरपेक्षता घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदु समाज नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे.
३. श्री. प्रणव मिश्र, वेद भारती संस्कार शाळा, बदायू, उत्तरप्रदेश : गझनीच्या काळात आई-बहिणींची थोड्या पैशात विक्री केली जात होती. त्या दुराचारींना आज ‘महान’ ठरवले जात आहे.
४. श्री. दीपक सिंह, बजरंग दल, देहली : हिंदूंवर अत्याचार होत असतांना अन्य हिंदू त्याकडे मूकदर्शक बनून पहात असतात; परंतु आपल्या देवतांनी ज्याप्रमाणे धर्माचे रक्षण केले, त्याप्रमाणे आम्ही हिंदूंनीही धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.
५. श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था : ज्या क्रूर अकबराने ४५ सहस्र हिंदूंची हत्या केली, त्या अकबराचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न देशात चालू आहे. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला पाहिजे. या देशात पुन: हिंदु राष्ट्र येईल, तेव्हाच हिंदूंवरील अन्याय समाप्त होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात