अनधिकृत कृत्यांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठवणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !
पिंपरी-चिंचवड : मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने अनेक वेळा आदेश देऊनही पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून त्याचे पालन केले जात नाही. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या असून ‘पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच’, असा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला आहे.
१. ७ डिसेंबर या दिवशी पिंपरीगाव येथील श्री हनुमान मंदिरात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष श्री. कुणाल साठे, शिववंदना गटाचे श्री. तुषार पाटील, श्री. अतुल कदम, देहू रस्ता येथील श्री. विवेक गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी आंदोलन करण्याविषयी, निवेदने देण्याविषयी, तसेच बैठकांच्या माध्यमातून जागृती करण्याविषयी ठरवण्यात आले.
२. पिंपरी येथील बैठकीतून प्रेरणा घेऊन हिंदुत्वनिष्ठांनी ९ डिसेंबर या दिवशी उत्स्फूर्तपणे काळेवाडी येथे बैठकीचे आयोजन केले. या वेळी ३० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
३. या अभियानाच्या अंतर्गत १० डिसेंबर या दिवशी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीधर जाधव यांनी ‘अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करू’, असे आश्वासन दिले, तसेच ‘हिंदुत्ववाद्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये’, असा समादेशही (सल्ला) दिला. या वेळी विविध संघटनांचे ३५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. (खरे तर नागरिकांना हा विषय हाती घ्यावाच लागायला नको होता; पण पोलीस आणि प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांना कृतीशील व्हावे लागत आहे. अशा वेळी पोलिसांनी केवळ नुसती आश्वासने न देता शीघ्रतेने कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
(म्हणे), २ मिनिटे भोंगे ऐका ! – पोलीस अधिकार्याचा अजब सल्ला
पिंपरी येथील बैठकीच्या वेळी एका हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी मी गेलो होतो; त्या वेळी तेथील पोलिसांनी ‘दोन मिनिटे भोंगे ऐकायला काय जाते ?’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.” (उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अनधिकृत भोंग्यावर कारवाई करण्याऐवजी असे सल्ले देणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात आंबेगाव येथील हिंदुत्वनिष्ठ एकवटले !
पेठ (मंंचर) येथेही अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदन देण्यात आले. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन श्री. गोडसे यांनी या वेळी दिले. निवेदनावर पेठ गावातील धर्माभिमानी नागरिक, तसेच आंबेगाव तालुक्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, अशा ७० जणांनी स्वाक्षरी केली होती. बजरंग दलाचे सातगाव पठारचे (पेठ) अध्यक्ष सर्वश्री उमेश कंधारे, बजरंग दलाचे संदेश काळे, अक्षय भालेराव आणि जितेंद्र कांबळे यांनी पुढाकार घेऊन निवेदन देण्याचे नियोजन केले. निवेदन देतांना बजरंग दलाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष सर्वश्री सुहासभाऊ बाणखेले, भाजपचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विनायक धुमाळ, वारकरी संप्रदायाचे बाबाजी चक्कर, हिंदु राष्ट्र सेनेचे अतुल काळे, बजरंग दलाचे नीलेश काळे, सूरज जाधव, स्वप्नील ढमाले, जयवंत खंडागळे, अक्षय कंधारे, सौरभ कवडे, ऋषिकेश काळे, हिंदु जनजागृती समितीचे रमेश तोत्रे, अक्षय तोत्रे, संतोष नवले, विठ्ठल वायकर, गणेश नवले आणि दिलीप शेटे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात