मंत्री आणि अधिकारी यांना रोख व्यवहार करण्यातच अधिक रस का आहे, याचा शोध नायडू यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांना वस्तूस्थिती लवकर लक्षात येईल !
मंत्री आणि अधिकारीच चलनविरहित व्यवहार करण्यास टाळत असतील, तर वीज, इंटरनेट आदी सुविधांंचा अभाव असणार्या ग्रामीण भागांतील जनता त्यांचा वापर कसा करणार?
अमरावती (आंध्रप्रदेश) : नोटाबंदीनंतर देशात सर्वत्र चलनविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशा वेळी आंध्रप्रदेशातील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी त्याचा वापर करतांना दिसत नाहीत, असे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना एका बैठकीत विचारल्यावर सांगितल्याचे समोर आले आहे. या वेळी संतप्त नायडू यांनी तुमच्यापेक्षा दारूडे बरे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. या बैठकीला अनुमाने २०० अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते.
नायडू म्हणाले की, जेव्हापासून नोटाबंदी चालू झाली, सर्वप्रथम राज्यातील दारूची दुकाने आणि दारू पिणार्या व्यक्ती या कॅशलेस व्यवहार करू लागल्या. दारूच्या दुकानावर कार्ड स्वाईप करून व्यवहार होतो. जर एखाद्या मद्यपीने रात्री दारू प्यायली नाही, तर तो अस्वस्थ होतो. त्यामुळे त्यांनी ही पद्धत तुमच्यापेक्षा लवकर अवलंबली. त्यांच्या गरजेतूनच हे निर्माण झाले; परंतु तुम्हाला अद्याप कॅशलेस व्यवहाराची आवश्यकता वाटत नाही. रोकडविरहीत व्यवहाराकडे पहाण्याची तुमची अशी मानसिकता असेल, तर देशात डिजीटल क्रांती कशी होणार ?
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात