शिवसेनेच्या आमदारांचा आदर्श सर्वत्रच्या लोकप्रतिनिधींनी घेतल्यास पाठ्यपुस्तकात भारताचा गौरवशाली आणि सत्य इतिहास समाविष्ट होण्यास वेळ लागणार नाही !
शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची चेतावणी
नागपूर : राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी. गोवा राज्यात ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकातील मोगलांच्या इतिहासाची माहिती काढून टाकण्यात आली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सातवीच्या पुस्तकातील ‘एन्सीईआर्टी’ने छापलेल्या मोगलांच्या इतिहासाची माहिती त्वरित काढून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि सत्य दैदिप्यमान इतिहास छापावा अन्यथा याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी येथे विधानभवनाच्या आवारात निदर्शने करतांना दिली.
‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे चित्र छापण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रसिद्ध न केल्याविषयी सर्व आमदारांनी ‘एन्सीईआर्टी’चा धिक्कार करून निषेध केला.
श्री. भरतशेट गोगावले यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना ‘एन्सीईआर्टी’च्या पाठ्यपुस्तकातील माहितीच्या संदर्भातील मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
या आंदोलनात शिवसेनेचे आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, उल्हास पवार, मंगेश कुडाळकर, अजय चौधरी, किशोर पाटील, शरद सोनावणे, सुभाष भोईर, मनोहरशेठ भोईर, प्रकाश अबिटकर, संजय रायमूलकर, राजाभाऊ वाजे, प्रकाश फातर्पेकर आणि डॉ. राहुल पाटील आदी सहभागी झाले होते. या वेळी आमदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय !’, ‘छत्रपतींचा खरा इतिहास प्रसिद्ध न करणार्या ‘एन्सीईआर्टी’चा धिक्कार असो !’, ‘जय भवानी जय शिवाजी !’, ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा अंर्तभूत झालाच पाहिजे !’, अशा घोषणा दिल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात