शिरोडा (फोंडा) येथे हिंदूसंघटन मेळावा संपन्न !
फोंडा – हिंदूंवर आज विविध माध्यमांतून आघात होत आहेत. लव्ह जिहाद, बिलिव्हर्सच्या धर्मांतराच्या कारवाया आदी माध्यमांतून हे आघात होत आहेत. हिंदूंवर होणारे हे आघात रोखण्यासाठी क्रियाशील हिंदूसंघटन ही काळाची गरज आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने धालोमांड, पाज, शिरोडा, फोंडा येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ‘राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात आणि हिंदूसंघटनाचे महत्त्व’ या विषयावर श्री. सत्यविजय नाईक बोलत होते. या वेळी शिरोडा येथील हिंदु धर्माभिमानी श्री. महेश पारकर आणि सनातन संस्थेच्या सौ. दीपा मामलेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदूसंघटन मेळाव्याला श्री. महेश पारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. प्रारंभी प्रास्ताविक करताना श्री. महेश पारकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात हिंदूंनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर हिंदुत्वनिष्ठ वक्त्यांनी हिंदूसंघटन मेळाव्याला संबोधित केले. सनातनच्या सौ. दीपा मामलेदार यांनी ‘धर्माचरण’ या विषयावर मार्गदर्शन करतांना आनंदी जीवन जगण्यासाठी अध्यात्माचे श्रेष्ठत्व प्रतिपादीत केले. योग्य प्रकारे साधना कशी करावी, कुलदेवता आणि दत्ताचा जप यांचे महत्त्व, आदी सूत्रांविषयी या मार्गदर्शनातून उपस्थितांना अवगत करण्यात आले. मेळाव्याच्या अखेर गटचर्चा घेण्यात आली. या गटचर्चेत ग्रामस्थ सर्वश्री श्रीकांत नाईक, लवू वेळीप आदींनी सक्रीय सहभाग घेऊन शंकांचे निरसन करून घेतले. मेळाव्याचे आभारप्रदर्शन श्री. महेश पारकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. शैलेश बेहरे यांनी केले.