Menu Close

काळवंडलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल !’

‘प्रखर उन्हामुळे (सूर्याच्या अतीनील किरणांमुळे) त्वचा काळवंडली जाण्याला इंग्रजी भाषेत ‘सनबर्न’ म्हटले जाते. शब्दाच्या अर्थाशी साधर्म्य असणारा आणि अमली पदार्थांच्या माध्यमातून युवा पिढीला सांस्कृतिक अन् नैतिकदृष्ट्या काळवंडणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत फुरसुंगी (जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे. व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणार्‍या या कार्यक्रमाला संस्कृतीप्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून ‘देशाची सांस्कृतिक राजधानी असणार्‍या पुण्यामध्ये असले कार्यक्रम नकोच’, अशी मागणी जोर धरत आहे.

१. ‘सनबर्न फेस्टिव्हल’साठी पुण्याचीच निवड का ?

‘सनबर्न’च्या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि अमली पदार्थ या विषयाकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक ठरेल. गोवा शासनाने नाकारलेल्या या कार्यक्रमासाठी आयोजकांनी मुंबई, नागपूर आदी शहरे अथवा अन्य राज्यांतील शहरे यांपेक्षाही पुण्याची निवड करणे हे ‘रॅन्डम सिलेक्शन’ नाही. पुण्याला पडलेल्या अमली पदार्थांच्या विळख्यामध्ये पुण्याच्या निवडीचे कारण असू शकते !

२. अमली पदार्थांच्या विळख्यात पुणे !

पुणे शहराला विद्येचे माहेरघर समजले जाते. पुणे हे शैक्षणिक केंद्र असल्यानेच परराज्यातील, तसेच परदेशातील अनेक युवक आणि युवती शिक्षणानिमित्त शहरात येत असतात. त्यामुळेच की काय अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आणि अमली पदार्थांना ग्राहक मिळवून देण्यासाठी पुणे शहरावर लक्ष्य केंद्रित केले जात असावे. व्यसनांच्या आहारी जाण्यात युवावर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. एका आकडेवारीनुसार भारतात १० कोटी ८० लाख युवक विविध व्यसनांच्या जाळ्यात अडकले आहेत. देशात धूम्रपानामुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू होतात. सर्वाधिक प्रमाणात सिगारेट ओढणार्‍यांमध्ये चीनच्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो !

पुणे शहर आणि परिसरात अमली पदार्थांची तस्करी होण्याच्या, तसेच अमली पदार्थ जप्त करण्याच्या घटना घडत आहेत. नुकतेच सिम्बायोसिस महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्यासह अन्य एकाला मेफोड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून १ लाख ९ सहस्र रुपये किमतीचे मेफोड्रोन आणि एक स्कोडा कार जप्त केली. विमाननगर परिसरातील सीसीडी चौकातील सार्वजनिक रस्त्यावर दोघे जण अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. पिंपरी येथेही याच मासात ब्राऊन शुगर विकण्यासाठी आलेल्या एका समीरा फैजानअहमद अन्सारी या बुरखाधारी महिलेला पकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने तिच्याकडून ५० लाख रुपयांची १ किलो ब्राऊन शुगर जप्त केली. कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे व्यवहार केले जात असल्याच्या बातम्या अधूनमधून झळकत असतात. नुकतेच गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने लेवी मडुग्वे या नायजेरियन व्यक्तीला साधू वासवानी चौकात अटक केली. त्याच्याकडून १ लाख १३ सहस्र रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले.

अमली पदार्थांच्या जोडीलाच ‘रेव्ह पार्ट्यां’चा विषयही भयावह आहे. लोणावळा येथे, तसेच पुणे-मुंबई महामार्गावर बंगल्यांमध्ये पोलिसांची नजर चुकवून ‘रेव्ह पार्ट्या’ आयोजित केल्या जातात, हे उघड गुपित आहे. मार्च २००७ मध्येही सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या ‘रेव्ह पार्टी’त टाकलेल्या छाप्यात २५० हून अधिक तरूणांना कह्यात घेतले होते. एकूणच पुणे शहर आणि परिसराभोवती असणार्‍या अमली पदार्थांच्या विळख्याची भयावहता स्पष्ट करण्यासाठी वरील प्रातिनिधीक उदाहरणे पुरेशी आहेत.

३. उच्चभ्रू वर्गच अमली पदार्थांच्या आहारी का ?

अमली पदार्थांचे सेवन करणे, तसेच रेव्ह पार्ट्या यांमध्ये साधारणपणे उच्चभ्रू तरूण-तरूणींचा सहभाग असल्याचे आढळून येते. याचे कारण आहे संस्कारांची पुंजी ! संस्कारांची शिदोरी दिवसेंदिवस कमी होत चालली असली, तरी अजूनही मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये संस्कारांचा धागा सापडतो. याउलट बर्‍याच वेळा उच्चभ्रू घरांमध्ये हिंदु संस्कृती, धर्माचरण, संस्कार यांना ‘टाकाऊ’ समजल्यानेच अशा घरातील युवक व्यसन आणि अमली पदार्थ यांच्या आहारी जाऊन स्वतःच टाकाऊ बनतात.

४. पाश्‍चात्त्य संगीत उच्छृंखलता वाढवणारेच !

‘हाय प्रोफाईल’ मेजवान्यांमध्ये आढळून येणारी अजून एक समान गोष्ट म्हणजे ‘डीजे’च्या दणदणाटात वाजवले जाणारे पाश्‍चात्त्य संगीत (पॉप संगीत) ! ‘सनबर्न’ फेस्टिव्हलमध्येही दणदणाटात ‘इलेक्ट्रॉनिक’ वाद्ये वाजवत हिडीस नृत्य केले जाते. मौजमजेच्या नावाखाली तरूणांची पावलेही मग पॉप संगीतावर थिरकू लागतात. त्यातूनच उच्छृंखलता वाढीते. असा अनुभव भारतीय शास्त्रीय संगीताच्या संदर्भात कधीच येणार नाही. शास्त्रीय संगीत लावल्यावर कोणाच्याच मनात बेभान होऊन थिरकण्याचा विचार येणार नाही. उलट भारतीय संगीत श्रोत्यांना मनःशांतीची अनुभूती देऊन जाते.

५. महसूल आणि पर्यटन वाढीचे अन्य स्तोत्र संपले का ?

गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंदिर येथे झालेल्या ‘पुणे फिल्म फेस्टिव्हल’च्या उद्घाटनाच्या समारंभात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी पुणे शहराला पाश्‍चात्त्य नववर्षानिमित्त (१ जानेवारी) ‘सनबर्न फेस्टिव्हल’ची भेट मिळणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार ‘सनबर्न’च्या आयोजकांसाठी महाराष्ट्र शासनाने पायघड्या अंथरल्या. महसूल, तसेच पर्यटन यांमध्ये वाढ होण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणे स्वागतार्ह असल्याचे सांगून मंत्र्यांनी तेव्हा स्वतःची पाठ थोपटून घेतली; पण खरे तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘सनबर्न’सारख्या फेस्टिव्हलच्या आयोजनाचा विचार करणे म्हणजे आपल्याकडे असणारे माणिक, हिरे आणि मोती यांकडे दुर्लक्ष करून दगडांची माळ घालून मिरवण्यासारखे आहे. पुण्यामध्ये प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये सवाई गंधर्व महोत्सव होतो. शास्त्रीय संगीताची अनुभूती घेण्यासाठी विदेशातील रसिकही आवर्जून या महोत्सवाला उपस्थित रहातात. सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणेच ‘ब्रॅन्डिंग’ करण्यासारख्या अनेक अद्वितीय गोष्टी पुणे शहरात आणि भारतात असतांना ‘सनबर्न’सारखा दळभद्रीपणा सुचणे दुर्दैवीच म्हणावे लागेल.

६. तेजाची उपासना करणारे समस्त भारतीय  नागरिक या कार्यक्रमास सनदशीर मार्गाने विरोध करतील !

हिंदूंची मूळ प्रकृती तेजस्वी आहे. तेजाची उपासना करून स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करण्याची आहे. म्हणूनच सूर्यामुळे त्वचा काळवंडणार्‍या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना सनदशीर मार्गाने विरोध करणे क्रमप्राप्त ठरते.’

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *