Menu Close

नववर्षात बांगलादेशात आक्रमणाचा कट रचणा-या ५ जिहाद्यांना अटक

ढाका : बांगलादेशमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या ५ संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे. हे संशयित जमात- उल- मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या ५ संशयित दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वी जुलै महिन्यात ढाका येथे झालेल्या कॅफे हल्ल्यातही दोषी ठरवण्यात आलं आहे. ढाका येथे कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्यात त्यावेळी २२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता तेच दहशतवादी नववर्षात पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याचं दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस प्रमुख मोनिरुल इस्लाम यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांकडून ६० किलोची स्फोटके जप्त केली आहेत. ढाकामध्ये पोलिसांनी रात्रभर घातलेल्या छाप्यात या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासून १ जानेवारी २०१७ पर्यंत बाहेर कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस बांगलादेशात दहशतवादी हल्ले वाढत चालले आहेत. हल्ल्यात उदारमतवादी लेखक आणि धार्मिक अल्पसंख्याक सदस्यांना ठार करण्यात आलं आहे. जमात- उल- मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना इसिस या दहशतवादी संघटनेप्रति निष्ठा ठेवत असल्याचीही माहिती मोनिरुल इस्लाम यांनी दिली आहे. कॅफे हल्ल्याची जबाबदारी इसिसने (इस्लामिक स्टेट) स्वीकारली होती. त्यावेळी ८ ते १० दहशतवाद्यांनी कॅफेत घुसून बेछूट गोळीबार केला होता.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *