इस्तंबूल : तुर्कस्तान प्रशासनाने देशभर घातलेल्या छाप्यांमध्ये इस्लामिक स्टेट च्या ६८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. इस्लामिक स्टेट च्या आत्मघातकी हल्लेखोराने मंगळवारी इस्तंबूलमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटात १० जण ठार झाले होते. मात्र या प्रकरणाशी संबंध असल्याने संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंकारा, इझमीर, सीरियाच्या सीमेजवळ असलेले किलीस शहर, सानलिऊर्फा, मेरसीन आणि अदना आदी ठिकाणी छापे टाकून ६५ जणांना अटक करण्यात आली, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अंकारामध्ये अधिकाऱ्यांनी १५ जणांना अटक केली. त्यांचा राजधानीच्या शहरावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे असा संशय होता, असेही वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सानलिऊर्फा येथे २१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचाही तुर्कस्तानमधील एका अज्ञात स्थळावर हल्ला करण्याचा इरादा होता. बुधवारी अन्ताल्या येथून आणखी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
संदर्भ : लोकसत्ता