नागपूर – अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. तेथील संपूर्ण वादग्रस्त जमीन ही मंदिरासाठीच देण्यात आली पाहिजे, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. गुरुवारपासून नागपुरात विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाचे संयुक्त अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यासाठी नागपुरात आलेले आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी ही भूमिका मांडली.
रामजन्मभूमीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने येथील वादग्रस्त जमिनीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय दिला होता. मात्र मूळ दावा हा या जमिनीचे तुकडे करण्यासंदर्भात नव्हताच. अशा स्थितीत जमिनीच्या तीन भागांना मान्यता कशी द्यायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र शासन राम मंदिराबाबत सध्या शांत असले तरी येत्या काळात निश्चित मंदिराची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदू संस्कृतीपासून दूर गेल्याने भ्रष्टाचारात वाढ
देशात भ्रष्टाचार, दुराचार वाढीस लागला आहे. हिंदू संस्कृतीपासून दूर गेल्याने भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, असा दावा राय यांनी केला. हिंदूंनी अस्पृश्यतेच्या कुप्रथेपासून दूर जाण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्वच धर्माचे लोक एकेकाळी हिंदूच होते. इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील लोकांना त्यांच्या पूर्वजांची आठवण करून द्यावी लागेल. जर असे झाले तर देशातील अनेक समस्या दूर होतील, असेदेखील ते म्हणाले.
स्त्रोत : लोकमत