पुणे, २९ डिसेंबर (वार्ता.) – केसनंद येथे सनबर्न या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी आहे. इथला गणेशोत्सव महाराष्ट्राचा लोकोत्सव म्हणून ओळखला जातो. अशा सण-उत्सवामुळे पुण्याचे पावित्र्य आजही टिकून आहे. अशा सुसंस्कृत शहरात सनबर्नसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. संस्कृती सोडून होणार्या अशा कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पुण्यनगरीच्या संस्कृतीला गालबोट लागत आहे. तरी या कार्यक्रमाला अनुमती नाकारा, असे निवेदन गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करणार्या जय गणेश व्यासपिठाच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. शंकरराव जाधव यांना देण्यात आले.
निवेदनात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न
१. वर्षानुवर्षे उत्सव साजरा करणार्या गणेशोत्सव मंडळांना ध्वनीक्षेपक, तसेच इतर अन्य अनुमती घेतल्यानंतरच उत्सव साजरा करता येतो. अशा प्रकारच्या अनुमती सनबर्नच्या आयोजनापूर्वी घेतल्या आहेत का ?
२. मिरवणुकीत अथवा उत्सवांत ध्वनीक्षेपकाची मर्यादा ओलांडली, तरी मंडळांवर गुन्हे प्रविष्ट होतात. सनबर्न कार्यक्रमामाठी पुष्कळ मोठे ध्वनीक्षेपक लावले जाणार आहेत. तेथे ध्वनीमर्यादा ओलांडली जाते का नाही, हे पहाण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या वतीने कॅलिब्रेशन मीटरचा वापर करणार का ?
३. सनबर्नचा गोव्यातील पूर्वेतिहास पहाता अशा कार्यक्रमात मद्यपान, तसेच अमली पदार्थांचा वापर असल्याची शक्यता आहे. पूर्वी रेव्ह पार्टीमुळे पुण्याची अपकीर्ती झाली होती. या निमित्ताने त्याची पुनरावृत्ती होणार का ?
४. या कार्यक्रमातून पुढील पिढीला नेमका कोणता वारसा हस्तांतरित होणार ? हातात पैसा असेल, तर कोणत्याही अनुमती मिळवता येतात, असा चुकीचा समज समाजापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तरी अशा बिनउपयोगी आणि पुण्यनगरीच्या संस्कृतीचा र्हास करणार्या कार्यक्रमास आपण अनुमती देऊ नये, अशी सर्व गणेशोत्सव मंडळांची आणि कार्यकर्त्यांची कळकळची विनंती आहे. या वेळी गुरुजी तालीम मंडळ ट्रस्टचे श्री. प्रवीण सेठ परदेशी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री. महेश शंकरराव सूर्यवंशी, शनिवारपेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे श्री. पराग शशिकांत ठाकूर, सेवा मित्र मंडळाचे श्री. शिरीष विठ्ठलाराव मोहिते, साईनाथ मंडळ ट्रस्टचे श्री. पियुश शहा यांसह अन्य उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात