नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी
नाशिक : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी केली. या मागणीसमवेतच विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ‘पनून काश्मीर’ या केंद्रशासित प्रदेशास मान्यता देण्यात यावी, महाराष्ट्रातील संत-देवता यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणारा, भारतीय संस्कृतीविषयी खोटी, अवमानजनक माहिती देणारी ‘एन्.सी.ई.आर.टी.’च्या पाठ्यपुस्तकांतील माहिती त्वरित पालटण्यात यावी तसेच बंगालमधील मालदा येथे धर्माधांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी मोदी शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशाही मागण्या करण्यात आल्या. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) श्री. जी.एम्. गाडीलकर यांना याविषयी निवेदन देण्यात आले.
या वेळी ‘शनिशिंगणापूरचे पावित्र्य भंग करू पाहणार्या तथाकथित पुरोगाम्यांचा धिक्कार असो !’ धिक्कार असो !, ‘एन्.सी.ई.आर्.टी. चा हिंदुद्रोही अभ्यासक्रम रहित करा ! रहित करा !!’ इत्यादी घोषणा देण्यात आल्या. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाचे निरीक्षण करण्यासाठी राज्य अन्वेषण विभागाच्या (एस्.आय.डी.) महिला अधिकारी शेवटपर्यंत उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात