रतलाम – आज धर्मग्रंथावर हात ठेवून घेतलेली साक्ष न्यायालय ग्राह्य धरल्या जाते. जर सेक्यूलर आणि पंथनिरपेक्ष राष्ट्रात धर्मग्रंथावरील शपथ चालू शकते, तर अन्य व्यवस्था धर्म आधारित का चालणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांनी केले. ते २७ डिसेंबर या दिवशी सनातन धर्मसभा आणि महारूद्र यज्ञ समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महापौर सौ. सुनीता यारदे, रतलाम महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद करंदीकर, पूर्वी विधायक श्री. कोमलसिंहजी राठौड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन धर्मसभेचे सहसचिव श्री. पुष्प्रेंद्र जोशी यांनी केले.
पू. डॉ. पिंगळे म्हणाले, धर्म म्हणजे केवळ तारक रूप नाही. धर्म चांगल्याशी चांगले आणि वाईटाशी वाईट वागायला शिकवतो.
जसे हनुमंत प्रभू श्रीराम आणि त्यांच्या भक्तासमोर अत्यंत दास्यभावात असतात, हेच हनुमंत रावणादी असुरासमोर आक्रमक असायचे. हा धर्म आहे. त्यामुळे धर्माची माहिती असणे आणि धर्म जीवनात असणे, यात अंतर आहे. जसे साखर आणि त्याची गोडी वेगळी नाही. त्याचप्रमाणे धर्म आणि मनुष्य वेगळे करता येत नाही. धर्म सर्वव्यापी असून ते त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे सर्वांनी धर्म समजून त्याचे आचरण करायला हवे.
मनुष्याला मनुष्य बनवण्यासाठी धर्मच आवश्यक ! – मिलिंद करंदीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री. करंदीकर म्हणाले की, एक उच्चशिक्षित डॉक्टर असून पू. पिंगळे धर्मप्रसार करत आहेत, हे स्तुत्य आहे. सर्व जण आपला धर्म श्रेष्ठ असे सांगतात. केवळ हिंदु धर्म सर्वांकडून शिकण्याची दृष्टी देतो. याशिवाय अजून सेक्यूलर धर्म कोणता असेल ? आज आपल्याला धर्म आणि विज्ञान या दोघांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. व्यक्ती शिक्षणाने कितीही मोठा झाला, तरी मनुष्याला मनुष्य बनवण्यासाठी धर्मच आवश्यक आहे.
प्रभू श्रीरामाप्रमाणे आपले सर्व दायित्व प्रामाणिकपणे पूर्ण करणे, हा धर्म ! – सौ. सुनीता यारदे, महापौर, रतलाम
आपले कर्म, दायित्व प्रामाणिकपणे करणे, हाही धर्म आहे. प्रभू श्रीरामाने आपल्या प्रत्येक धर्माचे यथायोग्य पालन केले. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, त्याचे आपण सोने केले पाहिजे. आज पू. (डॉ.) पिंगळे यांनी अतिशय वैज्ञानिक भाषेत धर्माचे महत्त्व समजावून सांगितले. यांच्यासारखे संत वारंवार आमच्या गावात यावेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर सदैव रहावा, असे रतलामच्या महापौर सौ. सुनीता यारदे म्हणाल्या.
प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळा तज्ञ जर आधुनिकता असेल, तर प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र देवता असणारा हिंदु धर्म मागासलेला कसा ?
या वेळी पू. डॉ. पिंगळे म्हणाले की, पूर्वी जनावर आणि मनुष्यासाठी एकच डॉक्टर असायचे. आता मनुष्याच्या प्रत्येक अवयवांसाठी स्वतंत्र डॉक्टर झाल्यावर आपण म्हणतो, तर विज्ञानाने प्रगती केली. जग आधुनिक झाले. त्याचप्रमाणे पाणी देते ती वरूणदेवता, नदीस्वरूपात असलेली जलदेवता, अशा ३३ प्रकारच्या देवता असलेला हिंदु धर्म मागासलेला कसा असेल ?
क्षणचित्र
कार्यस्थळी देवालय दर्शन, आचारधर्म, गौरक्षा याविषयीचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच सनातन संस्था प्रकाशित विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक पूजासामग्रीचे विक्री केंद्रही उभारण्यात आले होते.
या वेळी पू. डॉ. पिंगळे यांनी प्रोजेक्टरद्वारे सनातन आश्रमात करण्यात आलेले विविध यज्ञ आणि त्यात आलेल्या अनुभूती, यांविषयीची माहिती दिली.