हिंदु जनजागृती समिती आणि शिवप्रेमी यांच्या शिष्टमंडळाकडून नगराध्यक्षांची भेट !
भुसावळ – गेल्या १९ वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला आम्ही प्राधान्य देऊ, असे आश्वासन भुसावळ येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिले. हिंदु जनजागृती समिती आणि शिवप्रेमी यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षांची त्यांच्या दालनात भेट घेऊन शिवजयंतीपर्यंत हा पुतळा नियोजित स्थळी म्हणजे बाजारपेठ चौकात स्थानापन्न करावा, या मागणीचे निवेदन दिले. या वेळी उपनगराध्यक्ष श्री. युवराज लोणारी यांनी पुढाकार घेत पुतळ्याचे शिल्पकार श्री. रविंद्र चौधरी यांना त्वरित संपर्क केला आणि ३ जानेवारी या दिवशी पुतळ्याच्या कामाविषयीचा तपशील घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटीला बोलवले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, शहरातील बाजारपेठ चौकातील जागा सुनिश्चित होऊन भूमीपूजनही झाले असतांना गत १९ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीच्या कार्यात दिरंगाई होत आहे. यासंदर्भात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि शिवप्रेमी यांनी अनेक आंदोलने केली आहेत. हा पुतळा लवकरात लवकर उभारण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीनेही २ जून २०१६ या दिवशी भुसावळ शहरात भव्य मोर्च्याचे आयोजन केले होते. त्या वेळी तत्कालीन नगराध्यक्षांची भेट घेऊन त्या संदर्भात त्यांना सूचित करण्यात आले होते; परंतु ६ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही या पुतळ्याच्या उभारणीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कार्यवाही न होणे, हे खेदजनक आहे.
हे निवेदन देतांना स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रितेश जैन, समाजसेवक श्री. अभिजीत मराठे, युवा सेवा संघाचे श्री. हितेश टकले, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. उमाकांत शर्मा, छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. अक्षय पाटील, जय लेवा ग्रुपचे श्री. भूषण महाजन, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. देवेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट, तसेच सर्वश्री प्रशांत जुवेकर, उमेश जोशी आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात