ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दाते पंचांगाची होळी
- राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही सूत्रे राहिली नसल्यामुळे अशी विधाने करून ख्रिस्ती नवीन वर्षाच्या प्रारंभी जातीय दंगली घडवण्याचा सुप्त हेतू दिसतो. अशुभ दिवसाचा कोणताही अभ्यास न करता सोयीप्रमाणे चुकीचा अर्थ लावून जातीयवाद पसरवण्याचेच हे षड्यंत्र आहे. सरकारने अशा जातीयवादाला पायबंद घालावा, अशी हिंदूंची मागणी आहे !
- वर्ष २०१६ च्या पंचांगात १३ डिसेेंबर हा अशुभ दिवस सांगितला आहे; मात्र या दिवशी दत्तजयंती होती, तर वर्ष २०१७ च्या पंचांगात २४ फेब्रुवारी हा महाशिवरात्रीचा दिवसही अशुभ दिवस म्हणून दाखवला आहे. याविषयी आनंद परांजपे यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ठाणे : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर दाते पंचांगाची होळी केली. वर्ष २०१७ च्या दाते पंचांगामध्ये अन्य धर्मियांच्या सणांना अशुभ दिवस म्हणून दाखवणे, हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या वर्षीचे पंचांग मागे घेण्यात यावे अन्यथा दाते पंचांगाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करण्याची चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.
१. दाते पंचांगामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असलेला १४ एप्रिल हा दिवस अशुभ दिवस म्हणून दाखवला आहे.
२. तसेच प्रजासत्ताक दिन असलेला २६ जानेवारी हा दिवस वर्ज्य म्हणून दाखवण्यात आला आहे
३. गुरु गोविंदसिंग यांची जयंती असलेला दिवस, बुद्ध पौर्णिमा असलेला १० मे हा दिवस आणि येशू ख्रिस्ताचा जन्म असलेला दिवस अशुभ म्हणून दाखवण्यात आला आहे.
४. भाजपचे शासन आल्यापासून मनुवादी संस्कृती जाणूनबुजून रुजवली जात आहे. हिंदु धर्माच्या नावाखाली अन्य धर्मियांना कमी लेखण्याचा हा प्रयत्न आहे. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत असून दाते पंचांग हा त्याचाच एक भाग आहे, असा आरोप परांजपे यांनी केला.
शुभ आणि अशुभ दिवस हे मुहूर्तशास्त्राच्या नियमानुसार ! – अनंत (मोहन) धुंडिराज दाते
दाते पंचांगाची होळी करणे म्हणजे काहीही समजून न घेता केलेले राजकारण आहे. दाते पंचांगाच्या २०१७ च्या कॅलेंडरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा, गुरुनानक जयंती, ख्रिसमस आणि गणराज्यदिन, हे दिवस हेतु:पुरस्सर अशुभ दिवस दिले आहेत, अशा प्रकारचा लोकांच्या मनामध्ये अपसमज निर्माण केला जात आहे. त्यामुळे लोकांनी अपसमज करून घेऊ नये, असे आवाहन दाते पंचांगकर्ते श्री. मोहन दाते यांनी केले आहे. हे दिवस अशुभ असल्याचा उल्लेख महालक्ष्मी, तसेच अन्यही पंचांगात करण्यात आलेला आहे.
कॅलेंडरमध्ये देण्यात आलेले शुभ दिवस आणि अशुभ दिवस हे मुहूर्तशास्त्राच्या नियमानुसार (तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या ५ अंगांचा विचार करता) लग्न करणे, साखरपुडा करणे, नवीन वास्तूमध्ये रहावयास जाणे, वास्तूशांति करणे अशा कारणांसाठी दिलेले असतात. त्या दिवसांचा थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी आणि त्या अनुषंगाने साजर्या केल्या जाणार्या उत्सवाशी काहीही संबंध नसतो. वरील उल्लेख केलेले सर्व सण उत्सव हे वर्ष २०१६ चे कॅलेंडर पाहिले, तर आपल्याला अशुभ लिहिलेले दिसत नाहीत. त्याच वेळेस अनेक जयंती, सण आणि उत्सवांच्या दिवशीदेखील मुहूर्तशास्त्राच्या नियमानुसार अशुभ, अनिष्ट येत असल्याने तसे दर्शवलेले दिसतात.
वर्ष २०१६ च्या कॅलेंडरमध्ये २६ जानेवारी, गुडफ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुरुनानक जयंती, हे दिवस मुहूर्तशास्त्राच्या नियमानुसार शुभ होते, तेव्हा ते तसे लिहिलेले होते. त्याच वेळी महाशिवरात्री, श्रीकृष्ण जयंती, दत्त जयंती, अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी अशा काही महत्त्वाच्या दिवसांनादेखील मुहूर्तशास्त्रानुसार अशुभ येत असल्याने ते अशुभ असे लिहिलेले आहे. तसेच वर्ष २०१७ या वर्षी महाशिवरात्री, होळी, पंढरपूरची आषाढी एकादशी, त्याच बरोबर घरोघरी पूजल्या जाणार्या गौरींच्या आवाहनाचा दिवस, पूजनाचा दिवस, अनंत चतुर्दशी इत्यादी दिवस देखील तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांचा विचार करता अशुभ येत असल्याने ते अशुभ असे लिहिलेले आहेत. त्यामुळे काही विशिष्ट धर्मियांचे सण उत्सव अशुभ लिहिले आहेत, हे म्हणणे योग्य नाही.
हिंदूंची कालगणना पद्धत प्राचीन काळापासून चालू आहे. ती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असल्याचे, तसेच हिंदूंचे पंचांग अतिशय अचूक असल्याचे पाश्चात्त्य तज्ञही सांगतात. या कालगणना पद्धतीचा आणि पाश्चात्त्य कालगणना पद्धतीनुसार येणार्या दिनांकाचा काही संबंध नाही. असे असतांना निवळ काही तिथी आणि दिनांक जुळले; म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढून पंचांग जाळणे कितपत योग्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात