नवी देहली : तुर्कीमधील इस्तंबूल शहरात एका नाईट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या स्वागत समारंभात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३९ लोक ठार तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये १६ जण विदेशी नागरिक असल्याची माहिती इस्तंबूलचे गव्हर्नर वासीप शाहीन यांनी दिली. इस्तंबूल शहरात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका नाईट क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी प्रथम एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी पार्टीत सहभागी झालेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला. कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याचे गव्हर्नर शाहीन यांनी सांगितले. परंतु, अद्याप दहशतवाद्यांच्या कोणत्याच गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. अद्याप विस्तृत माहिती समोर आलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तुर्कीत हायअलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे इस्तंबूल शहरात सुमारे १७ हजार पोलीस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. यापूर्वीचे काही हल्ले हे कट्टरपंथी किंवा इस्लामिक स्टेट, कुर्द बंडखोरांनी केलेले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी रशियाचे राजदूत अँड्रेड कारलोव्ह यांची तुर्कीच्याच एका पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडून हत्या केली होती. गोळीबारानंतर सीरियामधील अलेप्पो शहरात झालेल्या घटनेत सहभागी असलेल्या रशियाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे हल्लेखोर ओरडून सांगत होता.
संदर्भ : लोकसत्ता