इतकी वर्षे समान नागरी कायदा का होऊ शकला नाही, याचेही भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आत्मपरीक्षण करावे !
नागपूर – गोव्यात अनेक वर्षांपासून समान नागरी कायदा लागू असतांना तेथे कुठलीही समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता यांसाठी केंद्र सरकारने तत्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने ठरावाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली आहे. विश्व हिंदु परिषदेच्या राष्ट्रीय प्रन्यासी मंडळ आणि व्यवस्थापन समितीने ही मागणी केली आहे. विश्व हिंदु परिषदेची व्यवस्थापन समिती अन् प्रन्यासी मंडळ यांच्या बैठकीचा ३१ डिसेंबरला नागपुरात समारोप झाला. या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला.
विहिंपने या ठरावात म्हटले आहे की,
१. जगातील बहुतांशी देशांमध्ये समान नागरी कायदा लागू आहे. त्यात इस्लामिक देशांचाही समावेश आहे.
२. एक देश, एक कायदा आवश्यक असून संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले होते. त्यामुळे हा कायदा लागू न करणे म्हणजे संविधानासह डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या विचारांचाही अवमान आहे.
३. तुष्टीकरणाच्या धोरणापायी हा कायदा देशात लागू होऊ शकला नाही. त्यामुळे देशात एका वर्गाच्या महिलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित रहावे लागत आहे. मुसलमान समाजातील कट्टरतेला त्यामुळे प्रोत्साहन मिळते आहे.
४. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा वेळोवेळी समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकार्यांनी न्यायालयाच्या या विचारांचा विरोध दर्शवत देश तोडण्याची धमकी दिली आहे. त्याचे परिणाम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान या राज्यांत हिंदूंवरील वाढत्या आक्रमणांमध्ये झाले आहेत. काश्मीर खोर्यातही कश्मिरीयतच्या नावावर खोर्यातील इस्लामी स्वरूप न पालटण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
या वेळी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देतांना विहिंपचे महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले, देशात हिंदूंवरील आक्रमणांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक भागांत हिंदूंवर विस्थापित होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे हिंदूंच्या सुरक्षेसाठी देशातील प्रत्येक वस्तीत बजरंग दलाची शाखा स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी प्रतिकात्मक त्रिशूळ धारण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात महाआरतीचे आयोजन केले जाणार असून युवकांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. राममंदिराच्या स्थापनेच्या जनजागरणासाठी गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीत रामोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात