पाकिस्तानात राहणार्या हिंदू अल्पसंख्याकांना सर्वोच्च नियामक मंडळाच्या समितीनी नववर्षानिमित्त एक अनोखी भेट दिली आहे. समितीने बहु-प्रतीक्षित हिंदू विवाह कायद्याला अंतिम मंजूरी दिली आहे. आता पाकिस्तानात हिंहू विवाह कायदा लागू होणार आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात नॅशनल असेंबलीने पाकिस्तानात राहणार्या हिंदू नागरिकांसाठी हिंदू मॅरेज बिल-२००६ पारित केले होते.
पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मागील ६६ वर्षांपासून पाकिस्तानात राहणार्या हिंदू नागरिकांच्या विवाहाची नोंदणी होत नव्हती. यामुळे येथील हिंदू अस्वस्थ होते. मात्र, आता पाक लोकसंख्येच्या २ टक्के हिस्सा असलेल्या हिंदू नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय घटस्फोट आणि जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यास मदत मिळणार आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
हा कायदा मंजूर झाल्याने पाकिस्तानात राहणार्या हिंदू नागरिकांना दुसरा विवाह करण्यास परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानातील मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट सीनेटर नसरीन जलील यांच्या अध्यक्षतेखाली सीनेट कमिटीने कायद्यावर सविस्तर चर्चा केली. पाक नॅशनल असेंबलीमधील अल्पसंख्याकचे सदस्य डॉ. रमेश कुमार वांकवानी म्हणाले, हिंदू विवाह कायदा पाकिस्तानात राहणार्या हिंदूंसाठी नववर्षाची भेट आहे. हा कायदा मंजूर झाल्याने आता आम्हाला पाकिस्तानी हिंदू असल्याचा अभिमान वाटत आहे.
संदर्भ : देशदूत