नवी देहली – श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना गोव्यात प्रवेश करण्यावर गोवा सरकारने बंदी घातली आहे. याविषयी श्री. मुतालिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर ३ जानेवारीला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने गोवा सरकारला यासंदर्भात येत्या ४ आठवड्यांत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे; मात्र न्यायालयाने सरकारच्या आदेशावर अंतरिम स्थगिती लावण्याची मागणी फेटाळली.
श्री. मुतालिक यांचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन म्हणाले की, गोव्यामध्ये श्री. मुतालिक यांच्या इष्टदेवतेचे मंदिर आहे, तरीही त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
१९ ऑगस्ट २०१५ मध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हादंडाधिकार्यांनी श्री. मुतालिक यांना ६० दिवसांसाठी गोवाप्रवेशबंदी केली होती. नंतर सातत्याने या कालावधीत वाढ करण्यात येत आहे. या संदर्भात श्री. मुतालिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात अर्ज केल्यावर खंडपिठाने या आदेशावर हस्तक्षेप करण्यात नकार दिला होता. त्यानंतर श्री. मुतालिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. अशी प्रवेशबंदी करणे हे घटनेने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. तसेच असा आदेश देणे जिल्हादंडाधिकार्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असेही त्यांनी यात म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात