उडुपी (कर्नाटक) जिल्ह्यातील कुथ्यार येथील हिंदु धर्मजागृती सभा !
उडुपी (कर्नाटक) – ज्या वेळी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे १ जानेवारीच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करत होते, त्या वेळी कुथ्यार येथील हिंदु धर्माभिमानी हे श्री सूर्य सभा भवन परशुराम क्षेत्रात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेसाठी जमले होते. शंखनाद आणि वैदिक मंत्रांच्या पठणाने सभेला प्रारंभ झाला. उडुपी येथील हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता दिनेश नायक, हिंदु जनजागृती समितीचे उडुपी येथील प्रवक्ता विजयकुमार, सनातन संस्थेच्या सौ. संगिता प्रभु आणि रणरागिणीच्या डॉ. (सौ.) श्रीकला जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ नायक यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना समितीचा उद्देश आणि कार्य यांच्यासंबंधी ओळख करून दिली. भारतभर होणारे राष्ट्रीय हिंदु आंदोलन हे प्रत्येक हिंदूसाठी आणि हिंदुत्ववादी संघटनांसाठी स्वत:च्या हक्कांसाठी लढण्याचे एक व्यासपीठ आहे, असे त्यांनी सांगितले. समाजातील दुष्प्रवृत्तींशी लढा देऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूं ऐक्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता दिनेश नायक यांनी केले.
मार्गदर्शन करतांना सौ. संगिता प्रभु म्हणाल्या, ‘‘हल्लीच्या काही वर्षांमध्ये घडणार्या घटनांकडे पाहता शासनकर्ते, त्यांची धोरणे आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, हेच लक्षात येते.’’
डॉ. (सौ.) श्रीकला जोशी यांनी मंदिरात प्रवेश करतांना कशा प्रकारचे कपडे परिधान करावे, यासंदर्भात रणरागिणीने उभारलेल्या चळवळीची माहिती दिली. तसेच या चळवळीला प्रत्येक हिंदूने पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन केले.
मथुरा आणि अयोध्या येथील मंदिरांच्या जागी असलेले वादग्रस्त ढाचे हटवून त्यांना स्वतंत्र करण्यास निधर्मी राजवट असमर्थ आहे. म्हणून हिंदु राष्ट्राची स्थापना हा एकच पर्याय ठरतो, असे आवाहन श्री. विजयकुमार यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात