उज्जैन (मध्यप्रदेश) येथे धर्माभिमानी हिंदूंना मार्गदर्शन !
उज्जैन (मध्यप्रदेश) : आज अनेक राजकीय भाषणांतून ‘जातीमुळे हिंदु समाज विभागला गेला’, असे सांगितले जाते. जाती हेच कलह, भांडण किंवा विभाजनाचे कारण असेल, तर एकाच घरात, एकाच संस्कारांत वाढलेल्या भावांमध्ये भांडणे का होतात ? धर्म विसरणे, हे कलहाचे मूळ कारण आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती धर्माचरण करेल, त्या वेळी कुटुंब, समाज, जाती आदींतील कलह दूर होऊन पुन्हा रामराज्य येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील ‘किड्डू सिटी स्कूल’ येथे नुकत्याच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘रामायणाच्या काळात प्रभु श्रीरामाने पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात जाऊन पुत्र धर्म पाळला आणि माता सीतेने पतीसह वनवासात जाऊन पत्नी धर्माचे पालन केले. सिंहासनावर ज्येष्ठ पुत्राचा अधिकार आहे, हे लक्षात घेऊन लक्ष्मण आणि भरत यांनी सिंहासनाचा त्याग केला. अशा प्रकारे रामायणाच्या काळात प्रत्येकाने धर्म लक्षात घेऊन त्याग केल्याने कलहाची जागा रामराज्याने घेतली. जेव्हा आपण धर्म समजून त्यागाची वृत्ती स्वतःत निर्माण करू, त्या वेळी रामराज्यास प्रारंभ होईल.’’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी केले. या कार्यक्रमास ४० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमात उपस्थितांनी जिज्ञासेने अनेक प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.
२. कार्यक्रमात हिंदु धर्माचे महत्त्व स्पष्ट करतांना ‘मंदिरातून प्रक्षेपित होणार्या ऊर्जेचे आधुनिक यंत्राद्वारे केलेले प्रयोग आणि यज्ञात अग्निप्रवेश करूनही काहीही न होणार्या तमिळनाडू येथील पू. रामभाऊस्वामी यांचे चलचित्र दाखवण्यात आले.
एकाधिकारी हुकूमशाहीपेक्षा जर लोकशाही श्रेष्ठ असेल; तर अनेक रूपांत कार्य करणार्या ईश्वराला मानणारा हिंदु धर्म एकेश्वरवादापेक्षा वाईट कसा ?
पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की, एकाच्या बुद्धीने चालणार्या हिटलरसारख्या राज्यव्यवस्थेपेक्षा केंद्रशासनाच्या नियंत्रणाखाली अनेक मंत्रालयांद्वारे चालणारी विक्रेंद्रित लोकशाही श्रेष्ठ समजली जाते. त्याचप्रमाणे अनेक रूपांत कार्य करणार्या एका ईश्वराच्या तत्त्वाला हिंदु धर्म मानतो. हिंदु धर्मात ‘पाणी हे जीवन आहे’, हे लक्षात घेऊन ते देणार्या वरुणदेवतेला पूज्य मानले जाते; प्राणवायूशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, हे लक्षात घेऊन वायूदेवतेचे पूजन केले जाते. जी भूमी एका दाण्यातून सहस्रो दाणे देऊन सर्वांचे पोषण करते, त्या भूदेवीला मातेचे स्थान देऊन तिचे पूजन केले जाते. इतकी समृद्ध आणि शास्त्रीय परंपरा असणार्या हिंदु धर्माला दूषणे देणे म्हणजे लोकशाहीला नाकारून हिटलरशाहीचा पुरस्कार करण्यासारखेच आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात