उज्जैन येथे ‘श्रीऋषि गुरुकुला’मध्ये मार्गदर्शन !
उज्जैन : वेदपाठशाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने वेदाचे ज्ञान मिळवण्यासह साधना करून गुरुकृपाही प्राप्त करावी. साधनेमुळे ईश्वराप्रती भाव निर्माण होऊन उपासनेचे बळही आपल्याला मिळते. भारतात रामराज्य आणण्यासाठी अशा ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे. हे तेज निर्माण करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणारे पुरोहित बना, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ४ जानेवारीला येथील श्रीऋषि गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गुरुकुलाचे संस्थापक श्री. देवकरण शर्मा (देव) आणि गुरुकुलाचे विश्वस्त श्री. रामकृष्ण पौराणिक उपस्थित होते.
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले की, ‘‘सृष्टीची निर्मिती नादाने झाली. त्यामुळे प्रथम नाद, नादातून अक्षर, अक्षरातून शब्द आणि मग शब्दाचा उच्चार (अर्थ) निर्माण झाला. त्याचप्रमाणे वेदमंत्रपठणाने जो नाद निर्माण होतो, त्याचा अर्थ जरी समजत नसला, तरी त्यामुळे वेदमंत्रपठण करणार्यांची चित्तशुद्ध होते.’’
विद्यार्थ्यांनी भारताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनावे ! – देवकरण शर्मा
या वेळी श्री. देवकरण शर्मा म्हणाले, ‘‘युगनिर्माणासाठी व्यक्तीनिर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आळस, संकुचित बुद्धी, भोगवासना यांचा त्याग करून आपण उपासनेच्या बळावर जीवनाला सोन्यासारखे केले पाहिजे. मुसलमान आणि इंग्रज यांनी आपली व्यवस्था बिघडवली. आता भारताच्या पुनरूत्थानासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांनी त्याचे साक्षीदार व्हायला हवे.’’
या वेळी श्री. रामकृष्णजी पौराणिक म्हणाले, ‘‘आज आपल्याला हिंदु धर्माला पुन्हा सशक्त बनवायला हवे. जेव्हा आपण सशक्त बनू, तेव्हा आपल्यापासून दूर गेलेले पुन्हा जवळ येतील.’’
अशी झाली आहे श्रीऋषि गुरुकुलाची स्थापना !
श्रीऋषि गुरुकुलाच्या स्थापनेविषयी संस्थापक श्री. देवकरणजी शर्मा (देव) म्हणाले, ‘‘मी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच गुरुकुलाच्या माध्यमातून सनातन धर्मासाठी कार्य करण्याचा निश्चय केला. त्यासाठी वर्ष २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्या वेळी मिळालेल्या ११ लाख रुपयांतून गुरुकुलासाठी जागा घेतली. या जागेत ४०० हून अधिक वृक्ष लावले. आज या परिसरात गोशाळा, वेदपाठशाळा, शिवमंदिर, भोजनशाळा, अध्यापक आणि विद्यार्थी यांचे निवासस्थान आहे अन् यज्ञशाळाही निर्माणाधीन आहे. सध्या या वेदपाठशाळेत शुक्ल यजुर्वेद आणि अथर्ववेदाचे शिक्षण दिले जात आहे. भविष्यात चारही वेदांचे शिक्षण देण्याची योजना आहे. देशभरात गुरुकुलासारखे मूल्याधारित पाठ्यक्रम सिद्ध करण्यासाठी माझा प्रयत्न आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात