Menu Close

फ्लोरिडा विमानतळावर माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार; पाचजण ठार

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडर्डेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल (शुक्रवारी) एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात पाचजण ठार झाले असून आठजण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आंतरराष्ट्रीय वेळेनुसार काल रात्री ११.३० वाजता घडली. टर्मिनल-२ च्या बॅगेज क्लेम एरियामध्ये ही घटना घडली असून, या घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने विमानतळ सील केले. या गोळीबारावेळी सर्व प्रवाशी टरमॅकमध्ये एकत्रित झाले होते. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना सुखरुप स्थळी हलवण्यात आले. अमेरिकेत गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादी हल्ला किंवा अन्य कारणांमुळे गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आजच्या गोळीबारानंतर विमानतळावरील सर्व व्यवहार तात्काळ थांबविण्यात आले आहेत.

पोलिसांना हल्लेखोराची ओळख पटली असून तो अमेरिकन सैनिक आहे. या व्यक्तीचे नाव इस्टर्बन सँटिआगो असल्याची माहिती सिनेटर बिल नेल्सन यांनी दिली. इस्टर्बन याने नोव्हेंबर महिन्यात त्याच्या मनाला नियंत्रित केले जात असल्याची माहिती एफबीआयला दिली होती. त्यानंतर इस्टर्बनला काही काळासाठी मनोरूग्णालयात पाठविण्यात आले होते. २००७ ते २०१६ या काळात सँटिआगो प्युअर्टो रिको नॅशनल गार्ड आणि अलास्का नॅशनल गार्ड या दलांमध्ये कार्यरत होता. याशिवाय, २०१० ते २०११ या काळात त्याने इराकमधील युद्धातही सहभाग घेतला होता. युद्धातील कामगिरीबाबत अनेक पदके देऊन त्याचा गौरवही करण्यात आल्याची माहिती पेंटॉगॉनतर्फे देण्यात दिली.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *