Menu Close

निरपेक्षपणे समाजपरिवर्तसाठी झटणार्‍या संघटनांच्या कार्याची पत्रकारांनी नोंद घेऊन त्यांना योग्य ती प्रसिद्धी द्यावी ! – अजय केळकर

जमलेले विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि पत्रकार

पंढरपूर : हिंदु जनजागृती समिती आज समाजात निरपेक्षपणे कार्य करत आहे. समिती अनेक लोकोपयोगी, सामाजिक, राष्ट्राभिमान जागृत करणारे, धर्मावर होणार्‍या आघातांना विरोध करणारे उपक्रम राबवते. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीसारख्या निरपेक्षपणे समाज परिवर्तनासाठी झटणार्‍या संघटनांच्या कार्याची पत्रकारांनी नोंद घेऊन त्यांना योग्य ती प्रसिद्धी द्यावी, असे मनोगत दैनिक सनातन प्रभात प्रतिनिधी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अजय केळकर यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथे सामाजिक संघटनांची पत्रकारांकडून अपेक्षा आणि संघटनांचे दायित्व या विषयावर ६ जानेवारी (पत्रकार दिन) या दिवशी चर्चासत्रात बोलत होते.

श्री. अजय केळकर

या वेळी पंढरपूर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळासाहेब बडवे, पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष श्री. दत्तात्रय खटवटे, देशासाठी प्रार्णापण करणारा सैनिक कुनाल गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांसह अन्य उपस्थित होते. तरुण भारतचे पत्रकार श्री. संकेत कुलकर्णी यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचा उद्देश श्री. अनिरुद्ध बडवे यांनी स्पष्ट केला.

श्री. अजय केळकर पुढे म्हणाले, हिंदूंच्या समस्या, घटना यांसदर्भात दैनिकाचे वार्ताहर जेव्हा वार्तांकन करतात, तेव्हा आपणही समाजाचा एक घटक आहोत, या भावनेने तसेच त्यांच्या संवेदना समजून घेऊन त्याला वाचा फोडली पाहिजे. या वेळी विविध क्षेत्रात काम करणार्‍या विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लब, वारकरी संप्रदाय, ग्राहक पंचायत, महापालिका यांसह काही पत्रकारांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

समारोपप्रसंगी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले म्हणाल्या, तुम्ही मांडलेल्या प्रश्‍नांशी मी सहमत आहे. शहरातील समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या समवेत आहे. तुमच्या सूचनांची योग्य ती नोंद घेऊन कृती करू. या प्रसंगी ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, श्री. सुनील वाळूंजकर, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री. प्रशांत वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या डिंपल घाटगे, ज्येष्ठ पत्रकार सत्यविजय मोहोळकर, श्री. संजय वाईकर यांसह अन्य उपस्थित होते.

या चर्चासत्रात श्री. अजय केळकर यांच्यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या काही जणांना पंढरपूर पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ पंढरपूर यांच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *