नवी देहलीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळामधील सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) तिजोरीवर चोरट्यांनी डल्ला मारला असून ८.५ किलो सोने लंपास केले आहे. या सोन्याची किंमत दोन कोटी रुपये एवढी आहे. दरम्यान या प्रकरणात अधिका-यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चोरट्यांनी तिजोरीतून सोने काढून त्याजागी हलक्या धातूच्या वस्तू ठेवल्या आहेत. यामुळे चोरट्यांना पूर्ण प्लान करुनच तिजोरीवर हात मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त असतानाही सोने चोरीस गेल्याने सर्वत्र आश्चर्य़ व्यक्त केले जात आहे. हे कृत्य एकट्या दुकट्या चोराचे नसून यात विमानतळ व सीमा शुल्क अधिका-यांचाही समावेश असल्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे.
यामुळे याप्रकरणी भारतीय दंडसंहितेशी संबंधित भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात सीमा शुल्क विभागाच्या तिजोरीतून सोने व इतर दागिन्यांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व घटनांमध्ये चोरटे तिजोरीतून सोने लंपास करुन त्याजागी इतर धातुंच्या वस्तू ठेवत असल्याचे आढळले आहे.
संदर्भ : सामना