उडुपी (कर्नाटक) येथे संस्कृतभारतीचे राष्ट्रीय अधिवेशन
उडुपी (कर्नाटक) – संस्कृत भाषेचा अभ्यास चरित्र निर्माणासाठी हातभार लावत असून संस्कृत हा भारताचा श्वास आहे. संस्कृतसाठीच जे जगतात ते धन्य होत. संस्कृत साहित्याचा संदेश हा सार्वकालिक आहे आणि वैदिक साहित्य यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे की, संस्कृतमुळे वाणी शुद्ध होते आणि चारित्र्य घडण्यास हातभार लागतो. मी आज अधिक संस्कृत बोलू शकत नाही; मात्र बालपणी झालेले संस्कृतचे संस्कार मनात दृढ आहेत, असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. संस्कृतभारतीच्या वतीने ६ ते ८ जानेवारी या कालावधीत उडुपी येथे अखिल भारतीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर पेजावर अधोक्षज मठाचे पीठाधीश श्री श्री विश्वतीर्थ स्वामी, कृष्णावर मठाचे श्री विद्यासागर तीर्थ महाराज, उडुपीच्या खासदार शोभा करंदलाजे, कर्नाटकचे मत्स्य आणि युवक सक्षमीकरणमंत्री श्री. प्रमोद मध्वराज, संस्कृत भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चांदकिरण सलूजा, संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री नंदुकमार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती महाजन म्हणाल्या, ‘‘आज आधुनिक शास्त्रज्ञ जगाच्या गुंतागुंती समजून घेण्यासाठी प्राचीन साहित्याचा आधार घेत आहेत आणि हे साहित्य संस्कृतमध्ये आहे. एक दिवस जगाची भाषा संस्कृत होईल, हे शक्य आहे आणि संस्कृतभारतीची या संबंधात महत्त्वाची भूमिका आहे.’’
संस्कृतला जनसामान्यांची भाषा करणे, हे आपले कार्य झाले पाहिजे ! – श्री श्री विश्वतीर्थ स्वामी
या वेळी श्री श्री विश्वतीर्थ स्वामी म्हणाले, ‘‘संस्कृतचा प्रसार करणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे. आपल्या सर्वांच्या मातृभाषा आमच्याच आहेत, मात्र सर्व भेदांना ओंलाडणारी संस्कृत ही एकमेव भाषा आहे. आपण सर्वांनी संस्कृतला आपलीच भाषा मानले पाहिजे. ही भाषा आज विद्वान आणि पंडित यांच्या वादविवादात बंदिस्त झाली आहे. तिला मोकळी करून जनसामान्यांची भाषा करणे, हे आपले कार्य झाले पाहिजे.’’
संस्कृत ही जगातील सर्वांत समृद्ध भाषा आहे ! – मत्स्य आणि युवक सक्षमीकरणमंत्री प्रमोद मध्वराज, कर्नाटक
प्रमोद मध्वराज म्हणाले, ‘‘संस्कृत न शिकणे ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी खंत आहे. ही केवळ माझीच नाही, तर कोट्यवधी लोकांची खंत आहे. ही जगातील सर्वांत समृद्ध भाषा आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात