अशा देशद्रोह्यांना शोधून फ्रान्सप्रमाणे शासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
भारतात इसिसला थारा मिळणार नाही, असे म्हणणार्यांना यावर काय म्हणायचे आहे ?
संभाजीनगर : मुसलमानांची लोकसंख्या असलेला भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा देश असून याचाच लाभ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) घेत आहे. देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात इसिसच्या गुप्त कारवाया चालू आहेत. इसिसकडे तरुणवर्ग आकर्षित होत असून त्यात महाराष्ट्राचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. आपली सुरक्षायंत्रणा सतर्क असून घातपाती कारवाया हाणून पाडण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी केले.(आणखी किती घातपाती कारवाया हाणून पाडण्यात येणार आहेत ? यापेक्षा इस्रायल आणि फ्रान्स यांच्याप्रमाणे प्रतिआक्रमण करून आतंकवाद्यांचे मूळ केव्हा नष्ट करणार, याविषयी शासन धोरण आखेल का ? – संपादक)
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू हे एका खाजगी कार्यक्रमासाठी संभाजीनगरमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, वर्षभरात घडलेल्या घातपाती कारवायांचे पुरावे पाकिस्तानला देण्यात आले; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. (शासनाने आता पाकशी चर्चा थांबवून त्यांच्यावर लष्करी कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक) सध्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा पुढील अन्वेषण करत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. देशाने सर्व सोयीसुविधा आणि मान दिलेला अभिनेता देश सोडून जाण्याचा विचार करतो आणि असहिष्णुतेची चर्चा करतो. ही चर्चाच मुळी सुनियोजित रितीने केली जात आहे.
आसाम आणि अरुणाचलप्रदेश येथील जनतेला अजून मूलभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत. ज्यांना या देशाने सर्वकाही दिले, ते देश सोडून जाण्याची भाषा करतात, यासारखे क्लेशदायक दुसरे काही नाही, अशी खंतही किरण रिजीजू यांनी व्यक्त केली. (या समस्येवर ठोस उपाययोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात