श्री समर्थ सेवा मंडळ (सज्जनगड) यांच्या वतीने ‘समर्थ संत सेवा पुरस्कार’ पू. स्वामी माधवानंद यांना प्रदान
पुणे : सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनी विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुमधुर समन्वय साधला. इंग्रजांनी या देशात असे चित्र उभे केले की, हा देश म्हणजे अंधश्रद्धांचे कडबोळे आहे. हिंदु धर्म म्हणजे भ्रामक कल्पना आणि भ्रमिष्ट यांचा समुच्चय आहे. या देशाची सर्वांत जास्त हानी ऋषीमुनी आणि परंपरा यांनी केले. अशी आमच्या धर्माची विकृत कल्पना इंग्रजांनी जगात पसरवली. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत ‘आपला धर्म हाच जगाचा धर्म आहे आणि भारत हा विश्वगुरु कसा ठरू शकतो’, हे सांगितले. हीच परंपरा पुढे अनेक संतांनी चालवली आणि त्याच परंपरेचे घटक म्हणजे स्वामी माधवानंद आहेत, असे प्रतिपादन समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी केले. विद्यावाचस्पती तथा स्वामी माधवनाथ यांचे उत्तराधिकारी पू. स्वामी माधवानंद (मूळचे डॉ. माधवराव नगरकर) यांना श्री समर्थ सेवा मंडळ (सज्जनगड) यांच्या वतीने ‘समर्थ संत सेवा पुरस्कार’ आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान सोहळा ८ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
या सोहळ्याला श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष प.पू. गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्यवाह समर्थभक्त पू. मारुतीबुवा रामदासी, कार्याध्यक्ष अधिवक्ता डॉ. द. व्यं. देशपांडे, पू. स्वामी माधवानंद यांच्या धर्मपत्नी सौ. आशा नगरकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पू. सुनील चिंचोलकर म्हणाले की, आज देशभक्ती हा चेष्टेचा विषय होत चालला आहे. राजकीय, शिक्षण आणि पारमार्थिक क्षेत्रात होणार्या दांभिकतेमुळेच आजचे तरुण उद्विग्न झाले आहेत. या सर्वांच्या विरुद्ध तरुण बंडखोर झाले आहेत; पण एखादे आदर्श उदाहरण त्यांच्यासमोर आले, तर ते नक्कीच त्याचा लाभ करून घेतील. येत्या काळात समर्थांचे हे कार्य नक्की वाढणार आहे.
थोर राष्ट्रपुरुषांचे चरित्र सर्व तरुणांपर्यंत गेल्यास राष्ट्राभिमान निर्माण होईल ! – स्वामी माधवानंद
भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ४ कर्मयोगांसह आणखी एक योग सांगितला, तो म्हणजे साक्षात्कार योग. तोच योग समर्थांनी लिहिलेल्या ‘दासबोध’मध्ये दिला आहे. समर्थांनी त्या काळातही ग्रंथालय स्थापन केले होते. समर्थ आणि शहाजीराजे यांच्या गाठीभेटी होत आणि त्यानंतरच स्वराज्याचा पहिला प्रयत्न शहाजीराजांनी केला. सर्व क्रांतिवीर राष्ट्राभिमानी होतेच; पण धर्माभिमानीही होते. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळे सामर्थ्य निर्माण झाले होते. बाळकृष्ण चापेकरांनी फाशी जाण्याआधी सूर्यनमस्कार घातले होते. ख्रिस्ती मिशनरी फाशीला जाण्याआधी सर्वांचे धर्मांतरण करायचे. चापेकरांना पाहून त्यांनी विचारले, ‘तुम्ही हे काय करताय ?’ त्यावर चापेकर म्हणाले, ‘आमच्या धर्मात सांगितले आहे, जे काही ईश्वरचरणी समर्पित करायचे, ते टवटवीत असले पाहिजे. म्हणून हा देह समर्पित करतांनाही तो टवटवीतच असला पाहिजे.’ अशा या थोर राष्ट्रपुरुषांचे चरित्र सर्व तरुणांपर्यंत गेले पाहिजे म्हणजे, त्यांच्यातही असा राष्ट्राभिमान निर्माण होईल.
कार्यक्रमामध्ये अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री. मधु नेने यांनी केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि वैदिक मंत्रोच्चारण यांनी झाला.
२. या कार्यक्रमाचे ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात आले.
३. राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याशी संबंधित घडलेल्या घटनेविषयी श्री. नेने म्हणाले की, चौकाचौकांमध्ये समर्थांचे कार्य गेले पाहिजे, तरच असे प्रसंग होणार नाहीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात