अकोला : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारी या दिवशी येथे एक दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. यात ५० युवक-युवतींनी सहभाग घेतला.
कार्यशाळेचे उद्घाटन धर्माभिमानी आणि निवृत्त अभियंता श्री. परमेश्वर राजपूत, समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि जळगाव येथील समितीचे प्रशिक्षक श्री. श्रेयस पिसोळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यशाळेचा उद्देश श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी सांगितला, तर श्री. श्रेयस यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता कशी आहे, याचे महत्त्व समजावून सांगितले. श्री. राजपूत यांनी मुलींसाठी प्रशिक्षण घेणे कसे अनिवार्य आहे, हे उदाहरणासह स्पष्ट केले. या कार्यशाळेत व्यायाम, ज्युडो-कराटे, दंडसाखळी आणि लाठीकाठी यांचे प्रकार शिकवण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी युथ कराटे अँड सेल्फ डिफेन्स क्लबचे अध्यक्ष आणि अकोला येथील नामांकित अधिवक्ता श्री. पप्पूभाऊ मोरवाल, जानकी सिड्सचे मालक श्री. संजय ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी श्री. मोरवाल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, सुट्टीच्या दिवसांमध्ये मी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना भेटणे, हिंदूंनी संघटित करणे, त्यांना समितीच्या राष्ट्र-धर्मकार्यात सहभागी करून घेणे, यासाठी प्रयत्न करीन.
श्री. संजय ठाकूर म्हणाले, कार्यशाळेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे गांभीर्य लक्षात आले. साधना केल्यानेच आपण धर्मकार्य यशस्वीपणे करू शकतो, यासाठी प्रतिदिन साधना केली पाहिजे. समितीच्या प्रत्येक कार्यात मी सहभागी होण्याचा प्रयत्न करीन.
क्षणचित्रे
१. कार्यशाळेतील १५ जणांनी पुढील प्रशिक्षकांच्या कार्यशाळेत सहभागी होऊन स्वतः प्रशिक्षण वर्ग घेण्याची सिद्धता दर्शवली.
२. कार्यशाळेत युथ कराटे अँड सेल्फ डिफेंन्स क्लबचे राज्य स्तरावर खेळलेले १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वांनी कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी क्लबचे आंतरराष्ट्रीय पदक विजेता आणि मुख्य प्रशिक्षक श्री. मनोज अंबेरेसर यांनी सर्व खेळाडूंचा पाठपुरावा करुन त्यांना कार्यशाळेत आणले. खेळाडू म्हणाले, आज आम्ही या कार्यशाळेत सहभागी होण्याचे टाळले असते, तर ती आमची मोठी चूक झाली असती. येथे आम्ही एका वेगळ्याच विश्वात होतो.
३. कार्यशाळेच्या माध्यमातून ६ प्रशिक्षणवर्ग, कारंजा येथे एक दिवसीय कार्यशाळा, तसेच १५ दिवसातून एकदा प्रशिक्षकांसाठी वर्ग घेण्याचे निश्चित झाले.
४. कार्यशाळेत ८ गावांतील मुलांनी सहभाग घेतले.
५. कार्यशाळेसाठी सभागृह, परिसर, दुपारचे भोजन, अल्पाहार, चहापाणी विनामूल्य स्वरूपात मिळाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात