जिंतूर (जिल्हा परभणी) येथे ५ वारकरी संतांना मारहाण केल्याचे प्रकरण
आळंदी : गाडीच्या धक्क्याने निळा ध्वज पडल्याच्या कारणावरून आळंदी येथील संजय महाराज पाचपोर यांच्या मठातील पाच वारकरी संतांना समाजकंटकांनी मारहाण करण्याची घटना घडली होती. जिंतूर (जिल्हा परभणी) येथे पोलिसांच्या समक्षच वारकरी संतांवर शाईफेक करणे, त्यांना उठाबशा मारायला लावणे असे प्रकार होऊनही पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या कृत्यास गृहखाते उत्तरदायी असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसल्याने अशा घटना घडत आहेत. या प्रकरणातील संशयितांवर सरकारने कठोर कारवाई करावी; अन्यथा वारकरी संप्रदायाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी दिली. वारकर्यांना मारहाण होण्याच्या घटनेच्या निषेधार्थ ९ जानेवारी या दिवशी ह.भ.प. राठोड महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कीर्तनकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपस्थित वारकरी संतांनी संबंधित पोलीस अधिकार्याला त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात