कोलकाता : कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या सभेला कोलकाता पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानावर आज (१४ जानेवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सभा होणार आहे. या सभेत सरसंघचालकही उपस्थित राहणार आहेत. या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने संघाने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने संघाच्या सभेला सशर्त परवानगी दिली. या सभेला बाहेरच्या व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. फक्त निमंत्रितांनाच सभेत उपस्थित राहता येईल. तसेच या सभेला येणारी गर्दी ही चार हजारच्या वर जाऊ नये अशी महत्त्वपूर्ण अटही कोर्टाने घातली आहे. दुपारी २ ते संध्याकाळी ६ या कालावधीमध्येच सभा घ्यावी असे उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले असून सभेच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कोलकात्यामध्ये होणा-या सभेला पोलिसांनी दोन वेळा परवानगी नाकारली होती. कोलकाताच्या पश्चिमेकडील किद्दरपोर येथील भूकैलाश मैदानावर सभा घेण्याबाबत संघाने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. भूकैलाश मैदानावरील सभेला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत मैदान लहान आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत पोलिसांनी या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर ब्रिगेड परेड मैदानावर सभेसाठी परवानगी मिळावी, अशी विनंती संघाच्या नेत्यांनी केली होती. पण पोलिसांनी पुन्हा या मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली. ब्रिगेड परेड मैदान खूप मोठे आहे. त्यात तेथून गंगासागर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अडचणी निर्माण येऊ शकतील, असे कारण पोलिसांनी देत तिथेही सभा घेण्यास परवानगी नाकारली होती.
संदर्भ : लोकसत्ता