Menu Close

शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेश हा नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुरोगामित्वाच्या नावाखाली शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेश करून धार्मिक प्रथा मोडण्याच्या प्रकरणासंदर्भातील वास्तव

डावीकडून अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, सौ. रश्मी नाईक, कु. मोनिका गावडे, श्री. सुनील घनवट, श्री. विजय गावडे

पुणे : देव भक्तीने प्रसन्न होतो, अहंकाराने नाही. स्वतःला शनिभक्त म्हणवून घेणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या कथित पुरोगामी महिला २६ जानेवारी या दिवशी महिलांना प्रवेश निषिद्ध मानलेल्या शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर चढून धार्मिक प्रथा मोडू पहाणार आहेत. ही त्यांची भक्ती नसून केवळ दिखाऊपणा आणि प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी आहे. धार्मिक प्रथा मोडण्यासाठी कथित पुरोगामी महिला येणार असल्या, तरी धार्मिक प्रथा आणि परंपरा यांच्या रक्षणार्थ अनेक महिला शनिभक्तही पुढे सरसावल्या आहेत. त्या देवस्थानाभोवती कडे करून चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न हाणून पाडतील. हा पुरोगामी महिला विरुद्ध श्रद्धाळू महिला असा लढा नसून नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. १५ जानेवारी या दिवशी शिवाजीनगर येथील स्पॅन एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, पतित पावन संघटनेचे पुणे शहर संघटक श्री. विजय गावडे, सनातन संस्थेच्या सौ. रश्मी नाईक आणि रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे उपस्थित होते.

धर्मशास्त्र मोडायला येणार्‍या ४०० महिलांच्या विरोधात २ सहस्र धर्मनिष्ठ महिला उभ्या ठाकणार ! – कु. मोनिका गावडे

श्रीशनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाची मूर्ती ही स्वयंभू असून तेथील चौथर्‍यावर केवळ महिलांना नाही, तर पुरुषांनाही बंदी आहे. शुचिर्भूत झालेले पुरुषच त्या ठिकाणी जाऊन पूजाअर्चा करू शकतात. धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या मंडळींकडून स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र उपस्थित केले जात असले, तरी यामध्ये विषमता वगैरे काही नसून हा पूर्णपणे धार्मिक आणि आध्यात्मिक विषय आहे. यासंदर्भात जनजागृती होत असून २६ जानेवारी या दिवशी धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या ४०० महिलांच्या विरोधात २ सहस्र धर्मनिष्ठ महिला उभ्या ठाकणार आहेत.

पतित पावन संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते धार्मिक प्रथा रक्षण मोहिमेत सहभागी होणार ! – विजय गावडे

शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करू पहाणार्‍या पुरोगाम्यांचे आंदोलन यशस्वी होऊ नये, यासाठी पतित पावन संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते २६ जानेवारी या दिवशी शनिशिंगणापूर येथे होणार्‍या धार्मिक प्रथा-परंपरा रक्षण मोहिमेत सहभागी होणार आहेत.

पुरोगामांच्या अयोग्य कृत्यांना कडकडीत विरोध करणार ! – अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे

धर्मशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करू पहाणार्‍या पुरोगाम्यांच्या अयोग्य कृतींना कडकडीत विरोध करणार असून २६ जानेवारीला धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेला हिंदु एकता आंदोलनाचा पाठिंबा असल्याचे अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे यांनी सांगितले.
या सूत्राला सामाजिक दृष्टीकोन नसून शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असण्यामागे आध्यात्मिक कारण आहे. त्यादृष्टीने या विषयाकडे पहायला हवे, असे मत सौ. रश्मी नाईक यांनी व्यक्त केले.

बुद्धीप्रामाण्यवादी पत्रकारांकडून अनावश्यक विरोधी प्रश्‍न

पत्रकार परिषदेच्या वेळी काही बुद्धीप्रामाण्यवादी पत्रकारांकडून श्रीशनिदेवाच्या दर्शनाने महिलांना त्रास होऊ शकतो, याचे वैज्ञानिक पुरावे द्या, अशा स्वरूपाचे अनावश्यक प्रश्‍न उपस्थित केले जात होते. पत्रकारांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करूनही चुकीच्या प्रथांना छेद देऊन परिवर्तन करण्याची हिंदु धर्माची परंपरा आहे अशाप्रकारची वक्तव्ये करून अध्यात्मशास्त्र आणि धर्मशास्त्र जाणून घेण्याचा रस दाखवला नाही. (दोन्ही बाजू जाणून घेऊन योग्य बाजू समाजापर्यंत पोहोचवण्याचे दायित्व पत्रकारांचे आहे. कोणत्याही अभ्यासाशिवाय मनात एक बाजू पक्की करून घेऊन विरोधासाठी विरोध करणारे पत्रकार समाजाला योग्य दिशा देऊ शकतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

प्रश्‍न : शनिदेव उग्र असल्याने देवाच्या दर्शनाने महिलांच्या ओटीपोटावर परिणाम होतो, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे का ? महिलांना त्रास झाल्याचे एकतरी उदाहरण सांगावे. हा तुमचाच प्रसिद्धीचा स्टंट वाटतो.

उत्तर : प्रत्येक गोष्ट वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकत नाही. विज्ञानाचे नियम अध्यात्माला लावता येऊ शकत नाहीत. अध्यात्मशास्त्र हे अनुभूतींचे शास्त्र आहे. अध्यात्माचे नियम समजून घेण्यासाठी त्यासाठी पात्र व्हावे लागते, म्हणजेच त्यासाठी साधना करावी लागते. ज्याची जशी श्रद्धा, तसे त्याला फळ मिळते, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. ऋषिमुनींनी शेकडो वर्षांपूर्वीच घालून दिलेले नियम चुकीचे असूच शकत नाहीत. प्रसिद्धीचा स्टंट करण्याची आम्हाला काहीच आवश्यकता नाही. प्रथा-परंपरा मोडण्याचे पुरोगाम्यांनी पहिले घोषित केले. त्यामुळेच आम्हाला धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याची मोहीम उघडावी लागली. यासंदर्भात आम्ही पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन दिले आहे. हिंदु सहिष्णू आहेत; म्हणून कुणीही उठावे आणि हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा मोडण्याचा प्रयत्न करावा, हे सहन केले जाणार नाही.

प्रश्‍न : पुरोगामी महिलांना अडवण्यासाठी बळाचा वापर करणार का ?

उत्तर : हिंदु जनजागृती समितीचे सर्व उपक्रम सनदशीर मार्गाने असतात. त्याप्रमाणे शनिशिंगणापूर येथेही सनदशीर मार्गानेच हिंदु धार्मिक प्रथा-परंपरा रक्षण चळवळ राबवण्यात येणार आहे. कुठे आततायीपणा होत असल्याचे निदर्शनास आल्यास आम्ही तेथे उपस्थित असणार्‍या पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊ.

प्रश्‍न : चुकीच्या परंपरांना छेद देऊन सुधारणा करण्याची हिंदु धर्माची परंपरा आहे. तसे येथेही महिला प्रवेशबंदीच्या चुकीच्या प्रथा बंद करायला नकोत का ?

उत्तर : देवदर्शन आणि चौथर्‍याचे पावित्र्य जपणे हा कर्मकांडाचा भाग येतो. कर्मकांडातील कृतींसाठी असलेले नियम पाळायलाच हवेत.

प्रश्‍न : महिलांच्या चौथर्‍यावरील प्रवेशामुळे देवाला काही होणार नाही. तुमच्या म्हणण्यानुसार पुरोगामी महिलांवरच त्याचा परिणाम होणार. मग तुम्ही त्यांच्या रक्षणासाठी मोहीम राबवत आहात का ?

उत्तर : देव अथवा पुरोगामी महिला यांच्या रक्षणासाठी नाही, तर धार्मिक प्रथा-परंपरा यांचे रक्षण व्हावे; म्हणून ही मोहीम राबवण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *